Join us  

coronavirus: यंदा देवीचे घ्या ऑनलाईन दर्शन, नवरात्रोत्सवासाठी महापालिकेची नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 8:13 PM

Mumbai news : गणेशोत्सवानंतर म्हणजेच १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत गेली. दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे.

मुंबई - गणेशोत्सव काळात नागरिकांच्या भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झाला. त्यामुळे नवरात्रोत्सवात विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. यंदा दांडिया रंगणार नसल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळांसाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी देवीच्या दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा वापर आणि नियमित निर्जंतुकीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. 

गणेशोत्सवानंतर म्हणजेच १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत गेली. दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यातच १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीनुसार देवीची घरगुती मूर्ती दोन फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूटच ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

सार्वजनिक मंडप उभारण्यासाठी ३० सप्टेंबरपासून परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गतवर्षी परवानगी घेतलेल्या मूर्तीकारांना यंदा स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांची परवानगी घ्यावी लागणार नाही. मात्र नवीन मूर्तीकारांना या परवानग्या घेणे बंधनकारक असेल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणार असल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. पारंपरिक मूर्तिकारांना परवानगी देण्यात येत असून अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार नाही. 

असे आहेत नियम...          

 - यावर्षी गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही. तसेच सार्वजनिक मंडळांनी देवीच्या ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी लागेल. 

- देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे.

- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करावे.

-  मंडपात थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरणची व्यवस्था असावी. तसेच मंडपात एकावेळी पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नसावे

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईनवरात्री