Join us  

Coronavirus: दादरमधील दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद राहणार; व्यापाऱ्यांचा स्तुत्य निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:38 PM

दादर परिसरातील 900 पैकी मोठी आणि गर्दीच्या ठिकाणची 610 दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांनी एक दिवसाआड दुकाने सुरु ठेवण्याचे सांगितले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.महाराष्ट्रात 49 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील दुकाने एक दिवसाआड बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले होते. यानुसार मुंबईची महत्वाची बाजारपेठ असलेल्या दादरमधील दुकाने गुढी पाडव्यापर्यंत सलग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दादर परिसरातील 900 पैकी मोठी आणि गर्दीच्या ठिकाणची 610 दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय दादर पश्चिम परिसरातील दादर व्यापारी संघाने घेतला आहे. यामध्ये मेडिकल आणि अन्य अत्यावश्यक दुकानांना वगळण्यात आले आहे. ही दुकाने 25 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून परिस्थिती चिघळल्यास पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात 49 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात 50 टक्केच उपस्थिती लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर शाळा, मॉल, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आधीच आदेश देण्यात आले आहेत. 

गोंधळ नकोमहापालिका आयुक्तांनी एक दिवसाआड दुकाने सुरु ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, दिवसाआड झाल्यास ग्राहकांचा गोंधळ उडेल. त्यांची फेरी वाया जाईल. यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही सलग दुकाने बंद ठेवणार असल्याची भूमिका व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यादादर स्थानकबाजारखरेदी