Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाच्या युद्धात निवासी डॉक्टर लढवय्ये; घरापासून लांब राहून रुग्णांसाठी ठरताहेत 'देवदूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 20:23 IST

CoronaVirus : निवासी डॉक्‍टर वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी संपादन करणारे विद्यार्थी आहेत.

मुंबई -  कोरोनामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत खऱ्या अर्थाने राज्यातील निवासी डॉक्टर लढवय्यांसारखे काम करत आहेत. अहोरात्र सेवा करत, घरापासून लांब राहत कर्तव्य बजावत हे निवासी डॉक्टर कोरोना कक्षात राबत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अविरतपणे सेवा देणारे जवळपास साडे चार हजार निवासी डॉक्टर कोरोनाच्या कुरुक्षेत्रात सmuमाजासाठी देवदूत ठरत आहेत.

निवासी डॉक्‍टर वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी संपादन करणारे विद्यार्थी आहेत. विभागप्रमुखांसह वरिष्ठ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनात ते रुग्णांवर उपचार करतात. मात्र, कोरोनाच्या भयावह स्थितीत राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्‍टर सैनिकांची भूमिका इमानेइतबारे निभावत आहेत. औषधवैद्यकशास्त्र, श्‍वसन विभाग, कान-नाक-घसा विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र अशा विविध विभागांतील निवासी डॉक्‍टर कोरोनाग्रस्तांसह संशयितांवर उपचार करीत आहेत. बऱ्याचदा निवासी डॉक्टरांच्या मागण्यांचा मुद्दा आला की, याच डॉक्टरांकडे बोट दाखविले जाते. मात्र सध्या राज्यात कोविडच्या स्थितीत वरिष्ठ यंत्रणांसमवेत बैठकांमध्ये व्यस्त असताना हे निवासी डॉक्टर कोरोना कक्षात जीव मुठीत घेऊन काम करत आहेत.

याविषयी,  महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना २०-२१ (मार्ड)चे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी सांगितले, राज्यातील सर्वच शासकीय महाविद्यालय व रुग्णालयांत १० -१० डॉक्टरांचा चमू करत आळीपाळीने ड्युटी करत आहेत. एका निवासी डॉक्टरला आठ तास ड्युटी करावी लागत आहे, वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांचा वॉर्ड निवासी डॉक्‍टरांसाठी हॉटस्पॉट आहे. तरी निवासी डॉक्‍टर स्वतःचा जीव धोक्‍यात टाकतात. राज्यातील तृतीय वर्षाला असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या परीक्षा नियोजित होत्या, त्यासाठी त्यांना सुट्या दिल्या होत्या. मात्र कोरोनामुळे या डॉक्टरांना पुन्हा ड्युटीवर रुजू झाले आहेत. सध्या निवासी डॉक्टर फ्रंटलाइनवर काम करत असल्याने पीपीई किट्स, एन 95 मास्कची उपलब्धता आहे, मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

मुंबईतही अडीच हजार निवासी डॉक्टर सैनिकांच्या रुपातमुंबई शहर उपनगरातही कोरोना बाधितांच्या संख्या दिवसागणिक वाढतेय. अशा स्थितीत पालिकेची जवळपास सर्व मुख्य रुग्णालय, शासकीय रुग्णालयांमध्ये बाधितांसह संशयितांवर उपचार केले जात आहे. अशा स्थितीत मुंबईतही अडीच हजार निवासी डॉक्टर सैनिकांच्या रुपात कोरोनाशी रात्रंदिवस लढत आहेत.

चित्त त्यांचे घरापाशी..राज्यातील अनेक निवासी डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहत असल्याने कुटुंबियांची चिंता त्यांना सतावत आहे. मात्र असे असतानाही दुसऱ्या बाजूला आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत हे सर्व जण काम करत आहे. अनेक निवासी डॉक्टरांचे पालक ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेकांचे लग्न झाले आहे, काही डॉक्टर राज्यातील दुर्गम खेडयापाड्यांत राहतात. बऱ्याचदा या डॉक्टरांना शारिरीक ताणासह मानसिक ताणाशी दोन हात करावे लागत आहेत. दुहेरी ताणामुळे नकारात्मक विचार येतात मात्र अशा स्थितीत सहकाऱ्यांच्या मदतीने एकमेकांना आधार देतात निवासी डॉक्टर लढत आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई