Join us

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:31 IST

Coronavirus : रविवारी रात्री असलेल्या शबे मेराजसाठी माहीम जामा मशीद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोनापासून देशवासीयांचे व जगभरातील मानव जातीचे रक्षण करण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. रविवारी रात्री असलेल्या शबे मेराजसाठी माहीम जामा मशीद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- खलील गिरकर 

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई व परिसरातील मशिदींमध्ये नमाजसाठी जाण्यापूर्वी तापाची तपासणी करण्यात आली. कोरोनापासून देशवासीयांचे व जगभरातील मानव जातीचे रक्षण करण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. 

रविवारी रात्री असलेल्या शबे मेराजसाठी माहीम जामा मशीद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साडेतीनशे वर्षापासून कार्यरत असलेल्या या मशिदीमध्ये रविवारी रात्री प्रवेश बंद करण्यात येणार असल्याची माहिती मशिदीचे विश्वस्त फहद खलील पठाण यांनी दिली. सध्या केवळ अनिवार्य (फर्ज) असलेल्या नमाजसाठी तेवढ्या कालावधीसाठी मशीद उघडण्यात येते. मशिदीमध्ये असलेले कॉलीन, कारपेट बाजूला करण्यात आले असून नमाज थेट मार्बलवर अदा केली जात आहे. नमाज झाल्यानंतर प्रत्येक वेळी दिवसातून पाच वेळा मार्बलचे पूर्ण निर्जंतुकीकरण केले जात आहे.

ज्या व्यक्तीमध्ये ताप अथवा कोरोना सदृश लक्षणे असतील. त्यांनी नमाजसाठी मशिदीत येण्याऐवजी घरीच नमाज अदा करावा असे, आवाहन करण्यात येत आहे. नमाजपूर्वी करण्यात येणारी वुजू घरीच करुन येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वुजूसाठी हौदाचे पाणी वापरण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहे.  मशीदीत केवळ फर्ज नमाज अदा करुन इतर नमाज घरी अदा करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले असून याचाच भाग म्हणून शबे मेराजसाठी रात्री प्रवेश बंद करुन मशीद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पठाण यांनी दिली. 

रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी म्हणाले, "बिलाल मशीद, छोटा सोनापूर व इतर मशिदींमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ताप आहे का? याची तपासणी करण्यात आली. सुदैवाने कोणामध्ये ताप किंवा इतर लक्षणे आढळली नाहीत. मशिदींमधील चटई बाजूला करुन मशिदींची पूर्ण स्वच्छता नेहमी केली जाते. त्याप्रमाणे या शुक्रवारी देखील स्वच्छता केली गेली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार व आरोग्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले." 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई