Join us  

Coronavirus : लोकल, बससेवा बंद झाल्याने पोलिसांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 3:47 PM

आयुक्तालयातील अंमलदारासाठी विशेष गाडी, एमटीच्या गाड्या मागविल्या

ठळक मुद्देड्युटी संपल्यानंतर घरी पोहचण्यासाठी विशेष बसची सोय करण्यात आल्याने सकाळपेक्षा तुलनेत प्रवास सोयीचा ठरला.‘लॉक डाऊन’मुळे सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने वाहतुकीला निर्बंधासाठी विविध मार्गावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अंमलदारांचे मोठे हाल झाले.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुर्णपणे बंद केल्याने उपनगर, नवी मुंबई, ठाण्यात रहात असलेल्या मुंबई पोलिसांची सोमवारी मोठी तारांबळ उडाली. कार्यालय, पोलीस ठाण्यात पोहचण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. मिळेल ते व मिळेल त्याठिकाणापर्यंत वाहनांना वापर करीत कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा २,३ तास अधिक लागले. ड्युटी संपल्यानंतर घरी पोहचण्यासाठी विशेष बसची सोय करण्यात आल्याने सकाळपेक्षा तुलनेत प्रवास सोयीचा ठरला.

दरम्यान, पोलीस आयुक्तालयात विविध ठिकाणी नियुक्तीला असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदारांना ने - आण करण्यासाठी विशेष बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली. पनवेल-मुंबई, ठाणे-मुंबई महामार्गावर विविध ठिकाणाहून त्यांना ‘पिकअप् अ‍ॅण्ड ड्रॉप’ची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी राज्य सरकारने ३१ मार्चपर्यत ‘लॉक डाऊन’ जाहीर केले आहे. त्यामुळे लोकल, बससेवा बंद केल्या. मात्र डॉक्टर, पोलिसांना ड्युटी अपरिहार्य असल्याने मुंबई बाहेर ठाणे, नवी मुंबईत राहणाऱ्या पोलिसांची सोमवारी मोठे हाल झाले. स्थानिक बस व मिळेल त्या वाहनांचा वापर करुन ते मुंबईच्या दिशेने येत होते. त्यांची होणारी गैरसोय लक्षात आल्यानंतर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मोटार परिवहन विभाग (एमटी) दोन बसेस मागविल्या. ठाणे व पनवेलला प्रत्येकी एक बस पाठवून देण्यात आली. अंमलदार त्यांच्या सोयीनुसार महामार्गावर थांबून राहिले, तेथून त्यांना घेवून बस आयुक्तालयात पोहचली. मात्र या प्रवासामध्ये नियमित वेळेपेक्षा सुमारे २,३ तास विलंब झाला. ड्युटी संपल्यानंतर आयुक्तालयातून त्यांना या बसमधून पुन्हा नियोजित ठिकाणी सोडण्यात आले.बंदोबस्तावरील पोलिसांची खाण्याचे हाल‘लॉक डाऊन’मुळे सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने वाहतुकीला निर्बंधासाठी विविध मार्गावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अंमलदारांचे मोठे हाल झाले. काहींनी घरातून आणलेल्या डबाच ऐकमेकांमध्ये ‘शेअर’करुन खाल्ला, काही ठिकाणी नागरिकांनी पोलिसांची ही अडचण लक्षात घेवून त्यांना अल्पोहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली होती.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईपोलिसरेल्वे