CoronaVirus News: जगात भारी!; कोरोना रोखण्यासाठी फिलिपीन्स राबवणार 'धारावी पॅटर्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 14:14 IST2020-08-18T13:59:27+5:302020-08-18T14:14:29+5:30
फिलिपीन्समध्ये लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असल्यानं धारावी पॅटर्न प्रभावी ठरणार

CoronaVirus News: जगात भारी!; कोरोना रोखण्यासाठी फिलिपीन्स राबवणार 'धारावी पॅटर्न'
मुंबई: काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील धारावीनं आता जगासमोर कोरोना मुक्तीचा पॅटर्न ठेवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावीत राबवलेल्या उपाययोजनांचं जगभरातून कौतुक झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी धारावी मॉडेलची तोंडभरून स्तुती केली आहे. यानंतर आता फिलिपीन्स सरकारनं धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेशी संपर्क साधला आहे.
धारावीप्रमाणेच फिलिपीन्समध्येही लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे फिलिपीन्स सरकार धारावी पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात आहे. फिलिपीन्स सरकारनं यासाठी संपर्क साधल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. 'आम्ही चेस द व्हायरस मोहीम राबवली. विषाणूचा पाठलाग करून त्याला लवकरात लवकर संपवण्याच्या दृष्टीनं ही मोहीम राबवण्यात आली. फिलिपीन्स सरकारलादेखील ही मोहीम राबवायची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना योजनेचा आराखडा दिला आहे,' असं चहल यांनी सांगितलं.
धारावी मॉडेल अतिशय सोपं आणि सुटसुटीत असल्याचं चहल म्हणाले. 'सर्वात आधी तपासण्या करा. फैलाव झाला असल्यास लगेच क्वारंटिन व्हा, हेच मॉडेल धारावीत राबवण्यात आलं. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला,' अशी माहिती त्यांनी दिली. धारावीत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८६ दिवसांवर पोहोचला आहे. याशिवाय धारावीत कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढली आहे. आधी एका दिवसात ४ हजार कोरोना चाचण्या व्हायच्या. आता तिथे १२ हजार चाचण्या केल्या जातात.
धारावीत कोरोना फैलावाचा दर ०.८ इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८१ टक्के इतकं आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ४.८ टक्क्यांवर आला आहे. सध्या धारावीतील ५ हजार ३८८ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. धारावीत अतिशय दाटीवाटीनं लोक राहतात. त्यामुळे संक्रमणाची शक्यता अतिशय जास्त आहे. मात्र या परिस्थितीतही मुंबई महापालिकेनं धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
फिलिपीन्समधील वृत्तसंकेतस्थळ इनक्वायररनं दिलेल्या वृत्तानुसार, फिलिपीन्सच्या आरोग्य मंत्रालयानं धारावी मॉडेल उत्तम असल्याचं म्हटलं आहे. फिलिपिन्समधील लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे धारावी मॉडेल प्रभावी ठरेल, असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे. धारावीत २.५ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात १० लाख लोक राहतात. म्हणजेच प्रति ९ वर्ग मीटरमध्ये ८ ते १० जण राहतात. अशीच काहीशी परिस्थितीत फिलिपीन्समध्ये आहे.
"शिववडापाव, थाळीनंतर शिवदवाखाने येणार; डॉक्टरांऐवजी कंपाऊंडर तपासणार"
डॉक्टरांवरील विधानामुळे वादात अडकलेल्या संजय राऊतांच्या मदतीला जितेंद्र आव्हाड धावले