Join us  

Coronavirus: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:01 PM

तबलिगी जमाततील अनेक लोक राज्यात आली आहेत. या संदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे कुठल्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई आपण करावी

ठळक मुद्देसुमारे १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाऊन काळातील परिस्थितीचं चिंतन होणं गरजेचे आहे

मुंबई – राज्यात कोरोनाची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पुण्यात एका दिवसात ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील या परिस्थितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी अनेक मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, सध्या देश आणि राज्य सारेजण कोरोनाविरोधात लढा देतायेत. हा लढा येणाऱ्या काळात आणखी तीव्र होणार आहे. राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. मी विविध घटकांशी संवाद साधत असताना ही तक्रार माझ्या निदर्शनास आली. केंद्र सरकारने ३ महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे आदेश दिले असताना त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला तरीही वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. यात तुम्ही स्वत: लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुमारे १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राला सुद्धा असा निर्णय घेणे सहज शक्य आहे. अतिरिक्त लागणारे धान्य केंद्र सरकार अत्यल्प दरात उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे वाटपातील साठा शिल्लक राहिल्याने त्याची गरज भासणार नाही. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून त्यांना धान्य उपलब्ध करुन द्यावे, तसेच ज्यांच्याकडे दोन्ही नाही अशांची यादी करुन त्यांनाही धान्य सहज उपलब्ध देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात केली आहे.

त्याचसोबत मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाऊन काळातील परिस्थितीचं चिंतन होणं गरजेचे आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांच्या सुरक्षा उपाययोजनांची कमतरता मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. जर योग्य उपाययोजना तातडीने केल्या नाहीत तर आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्सना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे.यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, तबलिगी जमाततील अनेक लोक राज्यात आली आहेत. या संदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे कुठल्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई आपण करावी. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या यादीत ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच अत्यंत कडक कारवाई याबाबत अपेक्षित आहे. राज्यात आणि मुंबईत वाढती संख्या चिंतेची बाब आहे. आपल्या निर्णयास भाजपा म्हणून आमचा पाठिंबा असेल मात्र या महत्त्वाच्या बाबतीत हस्तक्षेप करुन जनहिताचे निर्णय घ्याल अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे