Join us

Coronavirus: नेस्को कोविड केंद्रात दीड हजार नवीन खाटा, एकूण क्षमता आता तीन हजार ७०० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 23:06 IST

Coronavirus in Mumbai : गोरेगांव येथील नेस्को मैदानावरील भव्य कोविड केंद्रातील दुसऱया टप्प्यात दीड हजार खाटा वाढविण्यात आल्या आहेत. यापैकी दोनशे खाटा सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

मुंबई - गोरेगांव येथील नेस्को मैदानावरील भव्य कोविड केंद्रातील दुसऱया टप्प्यात दीड हजार खाटा वाढविण्यात आल्या आहेत. यापैकी दोनशे खाटा सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यापैकी एक हजार खाटा ऑक्सिजन पुरवठा सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या नवीन क्षमतेसह या केंद्राची एकूण क्षमता आता तीन हजार ७०० खाटांची झाली आहे.

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर महापालिकेने सात जंबो कोविड केंद्र बांधली आहेत. यापैकी एक असलेल्या गोरेगाव नेस्को केंद्रात २२०० खाटा आहेत. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढल्याने खाटांची टंचाई काहीकाळ जाणवली. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईतील कोविड केंद्रांमध्ये खाटांची क्षमता वाढवण्यात येत आहे. यापैकी सोमवारी नेस्को केंद्रात दीड हजार नवीन खाटांचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात एक हजार ऑक्सिजन खाटांसह ५०० सर्वसाधारण खाटा देखील आहेत. सोमवारी दोनशे खाटा कार्यान्वित करुन या सभागृहातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. तर टप्प्या-टप्प्याने सर्व खाटा कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

अशी आहे व्यवस्था....'ई' सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये २५० ते ३०० खाटांची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये केंद्रीकृत वातानुकूलन सुविधा आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये दोन नर्सिंग स्टेशन, एक अन्न वितरण विभाग, एक अग्नि नियंत्रण कक्ष, समवेत २४ x ७ तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती पुरवण्यासाठी नियंत्रण कक्ष आहे. एकूण आठ नोंदणी कक्ष, एक निरीक्षण कक्ष (१० रुग्णशय्या), एक क्ष-किरण विभाग आहेत. दीड हजार मनुष्यबळ, ५० सीनियर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय  अधिकारी, ३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहायक आणि ९० तांत्रिक कर्मचारीवर्ग यांचा समावेश आहे.

अशी वाढणार खाटांची क्षमता....नेस्को केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये २२०० खाटा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दोनशे एचडीयू खाटा तर ३०० ऑक्सिजन खाटा आहेत. दुसऱया टप्प्यातील दीड हजार खाटांसह या केंद्राची एकूण क्षमता तीन हजार ७०० खाटा इतकी झाली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई