Join us

Coronavirus: राज्यात कोरोनाची संख्या वाढतेय, चोवीस तासात ७२९ नवे रुग्ण तर एकूण ९३१८

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 07:16 IST

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोरोना आता अधिकच गंभीर विषय बनला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ७२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत

मुंबई - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 212,69 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,087,105 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29,974 हून अधिक झाली असून आतापर्यंत 937 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९३१८ वर पोहोचली आहे. त्यामध्ये, मृतांची आकडा ४०० पर्यंत पोहोचला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिलीय. 

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोरोना आता अधिकच गंभीर विषय बनला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ७२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९३१८ एवढी झाली आहे. त्यापैकी काल म्हणजे गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत १३८८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ४०० जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एकूण ७२२३ एवढी आहे.

देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायकही माहिती मिळत आहे. देशात 7027 तर जगात 935,115 जणांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई  जिंकली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 7027 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात लोक 9,35,115 बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :राजेश टोपेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई