CoronaVirus News: वरळी, धारावीनंतर आता 'हा' भाग कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; ५०० हून अधिक जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:55 IST2020-08-10T03:01:53+5:302020-08-10T06:55:56+5:30
मृत्युदर ९ टक्के असल्याची प्रशासनाची माहिती

CoronaVirus News: वरळी, धारावीनंतर आता 'हा' भाग कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; ५०० हून अधिक जणांचा मृत्यू
मुंबई : धारावी, माहीम आणि दादरनंतर आता घाटकोपर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनतो आहे. घाटकोपर या एन विभागात आतापर्यंत कोरोनाचे ५७५ बळी गेले आहेत.
मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे साडेपाच हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. घाटकोपरचा मृत्युदर ९ टक्के असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तो मुंबईच्या एकूण मृत्युदराच्या दुप्पट असल्याचे दिसून येते. घाटकोपर विभागात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीतही मार्च महिन्यापासून घाटकोपर सहाव्या स्थानावर आहे. या विभागात आतापर्यंत कोरोनाचे ६ हजार २६३ रुग्ण झाले आहेत.
कोरोनाचे रुग्ण शोधणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, उपचार करणे, बाधितांना क्वारंटाइन करणे आदी उपाययोजना अडचणीच्या झाल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि दाट लोकवस्तीमुळे घाटकोपरमधील कोरोना पसरत असल्याचे चित्र आहे.
घाटकोपरनंतर के पूर्व विभागात म्हणजेच अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्लेमध्ये कोरोनाचे ४६० बळी गेले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर यापूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या जी एन नॉर्थ विभागात आतापर्यंत कोरोनाच्या ४२६ मृत्यूंची नोंद झाली आहे. या विभागात धारावी, दादर आणि माहीमच्या परिसराचा समावेश आहे.