Join us  

Coronavirus : शाळा नाही, परीक्षा नाही... आता करायचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 2:13 AM

Coronavirus : कोरोनाच्या भीतीने टप्प्याटप्प्याने सार्वजनिक वाहतूक, सभा, समारंभ, गर्दीचे कार्यक्रम यांना बंदी आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीच्या परीक्षा यंदा रद्द करण्यात आल्याने मुलं भलतीच खूश झाली आहे. आधीची २ महिन्यांची सुट्टी आता ३ महिन्यांवर गेल्याने मुलांना नेमके कोणत्या प्रकारचे क्लासेस लावायचे? छंद कसे जोपासायचे? कधी नव्हे ते शाळा आणि क्लासच्या कटकटीतून मुक्त झालेल्या मुलांना संरचनात्मक पद्धतीने घडविण्याचा प्रयत्न कसा करायचा, याची चाचपणी पालकवर्गाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे या सुट्टीत नेमका काय फॉर्म्युला वापरून सुट्टी सत्कारणी लागेल, याचा विविध प्रकारे पालक आढावा घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कोरोनाच्या भीतीने टप्प्याटप्प्याने सार्वजनिक वाहतूक, सभा, समारंभ, गर्दीचे कार्यक्रम यांना बंदी आहे. पुढचा टप्पा म्हणून खबरदारीसाठी शाळांनाही सुट्टी दिली. एकीकडे सुट्टीनंतर दोन दिवस मुलांनाही गंमत वाटली. मात्र, अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांवर गदा आल्याने हीच सुट्टी मुलांना जाचक वाटू लागली आहे. दुसरीकडे या महिन्यात परीक्षांच्या टेन्शनमध्ये असलेले विद्यार्थी अचानक अभ्यासाच्या काय परीक्षांच्याच भीतीतून बाहेर पडले आहेत़ अशा वेळी अद्याप बेसावध पालकांना नेमके यांना गुंतवायचे कुठे आणि कसे, हा प्रश्न सतावू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.घरात बसून वैताग आला आहे. शाळेतून व्हॉट्सअ‍ॅपवर अभ्यास दिला आहे. हा अभ्यास पूर्ण केला जातो़ उरलेल्या वेळेत कुठेच जाता येत नाही. मैत्रिणींसोबत खेळता येत नाही. दिवसभर घरात बसून कंटाळा येतो. कधी एकदा हा कोरोना जातोय, त्याची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया आठवीतल्या प्रचिती ताम्हाणेने दिली. आता तर शाळांना वर्षभरातील मूल्यांकनाच्या आधारे निकाल घोषित करण्याच्या सूचना दिल्याने या सराव प्रश्नपत्रिकाही आहेत. त्यामुळे पालकांनी जास्तीतजास्त वेळ मुलांसोबत गॅझेट फ्री वातावरणात राहण्याच प्रयत्न करायला हवा. मुलांशी विविध विषयांवर संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया, मते जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास तर वाढेल. मात्र, त्यांचा दृष्टिकोन समजण्यास ही मदत होईल. घरातील छोट्या गोष्टींमध्ये मुलांची मदत घेऊन त्यांच्या सहाकार्याने घर आवरण्याची ही संकल्पना मुलांना स्वयंशिस्त लावण्यास सुट्टीचा वापर करता येईल, असे शिक्षिका सायली केळस्कर यांनी सांगितले.या सुट्टीत मी माझ्या मुलाची जेवण बनवण्यात मदत घेत आहे. सोबतच गार्डनिंग शिकवत आहे. घरातील छोटी-छोटी कामे किती महत्त्वाची आहेत, हे त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. या शिवाय अभ्यासाच्या गोष्टी तर सुरू आहेतच. मात्र, स्मार्टफोनवरील गेमिंगपासून त्याला दूर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे.- नीता शुक्ला,गृहिणी, घाटकोपरघरी राहू आनंदेकोरोनामुळे सध्या सर्वजण घरीच कुटुंबासोबत एकत्रित आनंद घेत आहेत. हा घरगुती वेळ आंनदी करण्यासाठी तुम्ही काय करीत आहात? मुलांसाठी काही नव्या आयडिया शोधल्या आहेत का? तुमचे काही नवे प्रयोग कदाचित इतरांना प्रेरणादायी ठरतील. घरबंदीचा हा काळ आनंददायी ठरवू या. तुमचे हे प्रयोग आम्हाशी फोटोसह शेअर करा. तुम्ही नेमके काय करता, त्याचा फोटो काढा आणि थोडक्यात माहिती लिहून आम्हाला  lokmat2020@gmail.com या इमेलवर पाठवा. त्यातील निवडक प्रयोगांना आम्ही प्रसिद्धी देऊ.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसशाळा