Join us  

coronavirus: 'काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येते'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 6:07 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधत आहेत

मुंबई - राज्यात कोरोनाची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पुण्यात एका दिवसात ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील या परिस्थितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी अनेक मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधकांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचा आरोपी विरोधकांकडून होत आहे. आता, विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय.  

देशासह राज्यभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वेगानं वाढत आहे. राज्यात मंगळवारी शेकडो नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहचली आहे. तसेच  मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या ४९० वर जाऊन पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे राज्यभरात एकूण ३४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशातील मृतांचा आकडा ११४ वर पोहचला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सरकारला टोला लगावला होता. देशाच्या तुलनेत ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. परंतु तरीही आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगल काम करतय असं ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला होता. राणेंच्या या टोल्याला उत्तर देताना, रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सोशल मीडियावरही कौतुक करण्यात येत आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरेंच जाहीर कौतुक केले होते. तर, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही उद्धव ठाकरेंमधील बदल विलक्षण असल्याचं म्हटलं. यावरुन रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलंय. 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात, पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल आणि त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील, तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला,” अशा शब्दात रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्यादेवेंद्र फडणवीसरोहित पवार