Join us

CoronaVirus : यंदा अकरावीसाठी शुल्कवाढ नकोच, सिस्कॉमची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 17:30 IST

CoronaVirus: अधिक शुल्क आकारणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांवर कोणती कारवाई केली जाईल हे जाहीर करावे, अशी मागणी सिस्कॉम या संघटनेकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यात आली आहे.

मुंबई: कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आहे. याच्या परिणामांना सामान्य जनतेला देखील सामोरे जावे लागत आहे. मुळातच दहावीचा निकाल यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेला ही उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक दरीत कोसळलेल्या पालकांना अकरावी प्रवेशावेळी तरी दिलासा मिळावा, यासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी मागील वर्षापेक्षा अधिक शुल्क आकारू नये. अधिक शुल्क आकारणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांवर कोणती कारवाई केली जाईल हे जाहीर करावे, अशी मागणी सिस्कॉम या संघटनेकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेकडून आणखी काही मागण्याही मेलद्वारे त्यांना करण्यात आल्या आहेत.

ज्या शैक्षणिक संस्थांना शक्य असेल अशा संस्थांनी होतकरू विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्याचे आवाहन करण्यात यावे असे सिस्कॉममार्फत सुचविण्यात आले आहे. तसेच वारंवार शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून पालकांकडे सुरु असलेला शुल्काचा तगादा अजूनही कमी झाला नसल्याने शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी संपूर्ण वर्षाचे शुल्क एक रकमी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांकडे तगादा न लावता त्यांना सोयीनुसार शुल्क भरण्याची मुभा मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पूर्वप्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंत शुल्क भरता आले नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नसल्याचे शासनाने जाहीर करावे. विद्यार्थ्याला शाळेतून काढल्यास काय कारवाई केली जाईल हे जाहीर करावेत असे सरकारमार्फत जाहीर करण्यात यावे अशी मागणी सिस्कॉमने केली आहे. तसेच या परिस्थितीत पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांकडे चांगल्या स्थितीत असणारी पुस्तके जमा करून घ्यावीत व गरजू विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. विद्यार्थी पालकांनी शैक्षणिक साहित्य नवीनच घेण्याचा आग्रह करू नये असेही सुचविले आहे. यामुळे पालकांवरील आर्थिक बोजा कमी होऊ शकेल.

सद्यपरिस्थितीमध्ये केजी टू पीजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जावी, ही आमच्या संस्थेची देखील मागणी आहे. परंतु आजच्या परिस्थितीत बहुतेक पालकांना ऑनलाईन प्रवेशाची माहिती नसताना यापद्धतीने प्रवेशास परवानगी नको अशी प्रतिक्रिया सिस्कॉमच्या वैशाली बाफना यांनी दिली. दरम्यान ऑनलाईन येणारे अर्ज जरूर स्वीकारावे परंतु प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया लॉकडाऊन संपल्यानंतर गुणवत्तेनुसार राबवावी. एन्ट्री पॉईंटसाठीची गुणवत्ता म्हणजे शाळेपासून जवळचे विद्यार्थी ही असेल असे जाहीर करावे असे त्यांनी सुचविले आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश दिलेले आहे. परंतु ज्या विद्यार्थ्याना सहामाही परीक्षेत चांगले प्रदर्शन करता आले नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन परीक्षा देण्याची संधी देवून पुढील प्रवेश डेटा येईल. यासाठी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करावी असे आवाहनही सिस्कॉममार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :शिक्षणमुंबई