Join us  

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात तब्बल २३,३५० रुग्ण; सहा दिवसांत १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 2:26 AM

३२८ मृत्यू; आतापर्यंतची बाधितांची सर्वाधिक दैनंदिन नोंद

मुंबई : सप्टेंबरच्या सुरुवातीपासून राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. राज्यात दिवसभरात तब्बल २३ हजार ३५० रुग्ण आणि ३२८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णनोंद आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ७ हजार २१२ झाली असून बळींची संख्या २६ हजार ६०४ झाली आहे.

सध्या २ लाख ३५ हजार ८५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०३ टक्क्यांवर आले असून मृत्युदर २.९३ टक्के आहे. दिवसभरातील ३२८ मृत्यूंमध्ये मुंबईत ३७, ठाणे २, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा ७, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा ३, मीरा-भार्इंदर मनपा २, पालघर २, वसई-विरार मनपा ७, रायगड ८, पनवेल मनपा २, नाशिक २, नाशिक मनपा ६, मालेगाव मनपा १, अहमदनगर ४, अहमदनगर मनपा ४, धुळे मनपा १, जळगाव ९, जळगाव मनपा ४, नंदुरबार १, पुणे १०, पुणे मनपा ३१, पिंपरी-चिंचवड मनपा ११, सोलापूर १४, सोलापूर मनपा १, सातारा १२, कोल्हापूर ४, कोल्हापूर मनपा ४, सांगली २५, सांगली-मिरज-कुपवाड मनपा १७, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना २, परभणी १, परभणी मनपा ३, लातूर ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद ११, बीड ७, नांदेड ६, नांदेड मनपा ३, अमरावती २, अमरावती मनपा ४, बुलडाणा २, वाशिम ३, नागपूर १३, नागूपर मनपा ९, वर्धा १, गोंदिया १, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा १ व अन्य राज्य/ देशातील एका रुग्णाचा समावेश आहे.

मुंबईत २३,९३९ सक्रिय रुग्ण

मुंबईत रविवारी १,९१० रुग्ण आढळले तर ३७ मृत्यू झाले. परिणामी बाधितांची संख्या १ लाख ५५ हजार ६२२ झाली असून बळींची संख्या ७,८६९ आहे. एकूण १ लाख २३ हजार ४७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २३,९३९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट होऊन तो ७१ दिवसांवर आला आहे.

अनलॉक सुरू होताच रुग्णसंख्या वाढली

राज्यात मार्च महिन्यात झालेला कोरोनाचा उद्रेक पाच महिन्यांनंतर ऑगस्ट महिन्यात नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र होते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील रुग्णांमध्ये तब्बल १ लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. १ ते ६ सप्टेंबर या काळात राज्यात १ लाख १४ हजार ३६० रुग्ण नोंद झाली आहे. अनलॉकचा टप्पा आणि नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.

पुण्याची स्थिती गंभीर, ६१ हजार सक्रिय रुग्णांवर उपचार

राज्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्ण नोंद पुण्यात ३ हजार ८०० एवढी झाली आहे. परिणामी एकूण बाधितांची संख्या १ लाख ९९ हजार ३०३ वर पोहोचली असून एकूण मृत्यू ४ हजार ४२९ झाले आहेत. १ लाख ३३ हजार ४९१ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या ६१ हजार ३८३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईउद्धव ठाकरे