CoronaVirus News: स्वच्छता कर्मचाऱ्यांची पालिकेच्या एम पश्चिम विभागासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:46 IST2020-06-18T01:46:29+5:302020-06-18T01:46:29+5:30
विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी; दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

CoronaVirus News: स्वच्छता कर्मचाऱ्यांची पालिकेच्या एम पश्चिम विभागासमोर निदर्शने
मुंबई : सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न न सुटल्याने स्वच्छता कर्मचाºयांनी चेंबूर येथील पालिकेच्या एम पश्चिम विभागासमोर बुधवारी निदर्शने केली. यावेळी स्वच्छता कर्मचाºयांनी घोषणा देत आपल्या मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्या, अशी मागणी केली. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत सरकार स्वच्छता कर्मचाºयांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला.
पालिकेच्या सफाई खात्यातील मृत, सेवानिवृत्त व वैद्यकीय असमर्थ कामगारांचे पेन्शन, उपदान, भविष्य निर्वाह निधी व वारसांना नोकरी हे प्रश्न निकाली काढण्यात यावेत. कामगारांच्या रजा, प्रवास भत्ता तसेच फंडाच्या पावतीवर वारसांची नावे या कामांकडे दुर्लक्ष न करता ती कामे पूर्ण करण्यात यावीत. कामगारांचे विविध अर्ज लिपिकांकडून हरवले गेले असून कामगारांच्या हक्काच्या रजाही कापल्या जात आहेत, त्या रजा कामगारांना वेळोवेळी मिळाव्यात. कामगारांना लागणारे मास्क, सॅनिटायझर, साबण, टॉवेल व गणवेश या वस्तू वेळेवर व नियमित देण्यात याव्यात, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
स्वच्छता कर्मचाºयास बारा वर्षे पूर्ण झाली असल्यास त्या कामगारास कालबद्ध पदोन्नती म्हणून मुकादम वेतन देण्यात यावे. राखीव कामगार व मुकादम यांना रिक्त झालेल्या जागांमध्ये भरती करण्यात यावे. स्वच्छता कर्मचारी आपल्या अडचणी वरिष्ठांना सांगण्यास गेले असता त्यांना चांगली वागणूक देण्यात यावी. अशा सर्व मागण्या यावेळी करण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही स्वच्छता कर्मचारी झोपडपट्ट्यांमध्ये काम करीत आहेत, तसेच सार्वजनिक शौचालय नियमित स्वच्छ ठेवत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे अशाही मागणी करण्यात आल्या.