Join us  

CoronaVirus News: मुंबईतील 'हा' परिसर ठरतोय नवा हॉटस्पॉट; अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:09 AM

CoronaVirus Latest Marathi News And Updates: राज्यात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभरात शुक्रवारी ३८२७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत आहे. मुंबईतील वरळी, धारावी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र राज्य सरकारच्या विविध उपाययोजनेनंतर वरळी आणि धारावीमधील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत गेली. परंतु आता उत्तर मुंबईचा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के झाल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र  पश्चिम उपनगरे आणि विशेषत: उत्तर मुंबईतील काही भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्यांची वाढ पाहता उत्तर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे  सील इमारतींमधील नियमांच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर, महापालिकेचे नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत शुक्रवारी कोरोनामुळे १ हजार २६९ रुग्णांचे निदान झाले असून ११४ मृत्यू झाले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात ४०१ रुग्ण बरे झाले आहेत

दरम्यान, राज्यात शुक्रवारी १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार  ७७३ झाली आहे. शुक्रवारी कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत असं राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४  नमुन्यांपैकी  १ लाख २४ हजार ३३१  नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख  ९१ हजार  ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र सरकार