Join us

Corona Vaccine : लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; पुरेशा लस साठ्याअभावी उद्या लसीकरण बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:57 IST

Corona Vaccine : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई - गेले काही दिवस सुसाट सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक लागणार आहे. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने गुरुवारी शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. 

मुंबईतच १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दररोज सरासरी एक लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये एका दिवसात एक लाखांहून अधिक लोकांना लस दिली जात आहे. सोमवारी आतापर्यंतचे सर्वाधिक एक लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक लोकांना लस मिळाली आहे. मात्र केंद्राकडून मिळणाऱ्या लसींचा साठा मर्यादित स्वरूपात असल्याने पुन्हा एकदा या मोहिमेला फटका बसला आहे.

लस मिळवण्यासाठी धावपळ...

लसीकरण मोहीम वेगाने सुरू ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने जागतिक स्तरावर निविदा मागून एक कोटी लस खरेदी करण्याची प्रयत्न केला होता. मात्र या स्पर्धेत सहभागी आठही पुरवठादार अपात्र ठरल्यानंतर ही निविदा गुंडाळण्यात आली. स्पुतनिक या लसीचे भारतातील वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीबरोबर पालिकेची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसमुंबई