CoronaVirus News : मालाडचा ‘दफ्तरी रोड’ रेड झोन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 01:06 IST2020-06-23T01:05:44+5:302020-06-23T01:06:04+5:30
CoronaVirus News : मालाड पूर्वच्या दफ्तरी रोडसह अजून काही परिसरांनाही सहभागी केले गेल्याची माहिती पालिकेच्या पी उत्तर विभागाकडून देण्यात आली असून या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

CoronaVirus News : मालाडचा ‘दफ्तरी रोड’ रेड झोन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलिसांच्या मदतीने महापालिकेकडून उत्तर मुंबईच्या काही विभागात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला. त्यात आता मालाड पूर्वच्या दफ्तरी रोडसह अजून काही परिसरांनाही सहभागी केले गेल्याची माहिती पालिकेच्या पी उत्तर विभागाकडून देण्यात आली असून या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मालाडमध्ये कोकणीपाडा, तानाजीनगर , शिवाजीनगर, क्रांतीनगर, आप्पापाडा, पिंपरीपाडा तर पश्चिमेला मोडणाऱ्या मढ, एमएचबी कॉलनी, राठोडी या ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता या ठिकाणी सर्व दुकाने बंद करण्यात आली. मालाड पूर्व परिसरातून मालाड रेल्वे स्थानकाकडे जाणाºया आणि नेहमीच वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या दफ्तरी रोडलाही यात सहभागी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.
त्याचसोबत संतोषनगर, पुष्पा पार्क, धनजीवाडी, कासमबाग आणि मकरानी पाडा या परिसराचा यात समावेश आहे. रविवारी पी उत्तर विभागात कोरोना रुग्णांची संख्या १०५ झाली होती. जी पावसात वाढीस लगल्याने याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार या परिसरात दिंडोशी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस रात्रंदिवस या ठिकाणी पहारा देत आहेत.
>नियम मोडणाऱ्यांवर कारवाई!
आम्ही दफ्तरी रोडवर एक अधिकारी आणि सहा अंमलदारांना तैनात केले आहे. या ठिकाणी मेडिकल आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद केले आहे. त्यामुळे जो कोणी नियम तोडेल त्याच्यावर कलम १८८ नुसार कारवाई केली जाणार आहे. - धरणेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
दिंडोशी पोलीस ठाणे