Join us

CoronaVirus News: कोरोना अहवाल २५ तासांमध्ये कळवण्याची प्रयोगशाळांना ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 22:05 IST

गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे काही खाजगी प्रयोगशाळा नियमांचे पालन करीत नसल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे.

मुंबई - मुंबईतील काही प्रयोगशाळा कोरोना चाचणीचा अहवाल पालिका व संबधित रुग्णाला कळविण्यास २४ तासांहून अधिक कालावधी लावत आहेत. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रयोगशाळांचा परवानाही रद्द होऊ शकतो, असा इशारा या परिपत्रकातून देण्यात आला आहे. तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची प्राधान्याने चाचणी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे काही खाजगी प्रयोगशाळा नियमांचे पालन करीत नसल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा अहवाल आल्यानंतर २४ तासांच्या कालावधीत याबाबत संबंधित रुग्ण व पालिकेला कळविण्यात येत नाही. यामुळे वॉर्ड वॉर रूममार्फत खाटांचे वितरण करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. त्यानुसार चाचणी अहवाल २४ तासांच्या कालावधीत आयसीएमआर पोर्टलवर व त्यानंतर संबंधित रुग्णांना कळवणे बंधनकारक असणार आहे.

दुपारी दोन पर्यंत प्रयोगशाळेत आलेले रुग्णांचा स्वाब तात्काळ तपासून त्याचा अहवाल त्याच दिवशी रात्री ११.५९ आधी अपडेट करावा. तसेच बाधित रुग्णालाही याबाबत कळविण्यात यावे. तर दुपारी दोननंतर आलेल्या स्वाबची चाचणी करून दुसऱ्या दिवशी त्याचा अहवाल पाठवण्यात यावा, असे सक्त निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच प्रयोगशाळेतील कर्मचारी रुग्णाच्या घरी जाऊन स्वाब घेत असतील तर लक्षणे असलेल्या रुग्णांना प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका