CoronaVirus News: "कर्तव्य बजावण्यास कमी पडलो नाही; शासनातर्फे मदत मिळाली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:48 AM2020-10-05T01:48:16+5:302020-10-05T01:48:28+5:30

CoronaVirus Mumbai News: आरोग्य सेविकेची व्यथा; विविध समस्यांचा विळखा

CoronaVirus News Duty did not fall short; No help from government | CoronaVirus News: "कर्तव्य बजावण्यास कमी पडलो नाही; शासनातर्फे मदत मिळाली नाही"

CoronaVirus News: "कर्तव्य बजावण्यास कमी पडलो नाही; शासनातर्फे मदत मिळाली नाही"

Next

- ओमकार गावंड

मुंबई : कोरोनाच्या काळात डॉक्टर व पोलीस यांच्यासोबतच अंगणवाडी सेविकांनीही आपली मोलाची भूमिका बजावली आहे. अगदी तुटपुंज्या पगारात व अत्यंत कमी सुरक्षा उपकरणात अंगणवाडी सेविका महाराष्ट्रात दारोदारी जाऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र हे काम करत असताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच अनुभव एका अंगणवाडी सेविकेने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

शासनाच्या वतीने अंगणवाडीसाठी आहार येतो. यात खिचडीचा समावेश असतो. मात्र कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनच्या वेळी शासनाने कोरडा खाऊ देण्याचे जाहीर केले. यात गहू, तांदूळ व डाळी यांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात सर्वांनाच या आहाराची गरज होती. शासनातर्फे जाहीर झालेल्या लाभार्थ्यांसोबतच इतरांनाही त्या अन्नाची गरज होती. परंतु काही कारणाने यामध्ये अत्यंत गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.
त्यावेळेस शासनाकडून आरोग्य सेविकांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज्, फेस शील्ड यापैकी काहीच देण्यात येत नव्हते. त्यामुळे दारोदारी जाऊन आपले कर्तव्य बजावताना मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली होती. परंतु आमची नियुक्तीच त्या कामासाठी केली असल्याने आम्हाला जबाबदारीचेही भान होते. कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे. मात्र सुरुवातीला अनेक वस्त्यांमध्ये अन्नवाटप करताना लोक गर्दी करायचे. आजही अनेक ठिकाणी मुले अंगणवाडीच्या खिचडीवर अवलंबून असतात. त्यामुळे तेथे अन्न पोहोचणे गरजेचे असते.

हळूहळू नागरिकांमधून कोरोनाची भीती कमी होत आहे. तरीही शासनाने आरोग्य सेविकांना विमाकवच देणे गरजेचे आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही नवीन घोषणा केली आहे. शासनाने दिलेली कोणतीही जबाबदारी आम्ही पार पाडू, मात्र आम्हाला सुरक्षाकवच अत्यंत गरजेचे आहे. बहुतांश अंगणवाडी सेविकांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, तर काही सेविका विधवा आहेत. या सर्व सेविकांचा उदरनिर्वाह हा अंगणवाडीच्या पगारावर अवलंबून असतो. कर्तव्य बजावत असताना या सेविकांना काही झाले तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. यासाठी विमाकवच असणे अत्यंत गरजेचे आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मुळे काम वाढले आहे. घरोघरी जाऊन नोंदी घेणे, लिखाण करणे याला नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी नागरिक संपूर्णपणे खोटी माहिती देतात. उदा. आम्हाला मधुमेह नाही, उच्च रक्तदाब नाही, आॅक्सिजन लेवल उत्तम आहे. अशी कारणे देत ते तपासणी टाळतात. लोक आपले दार उघडत नाहीत, विनंती करूनही आम्हाला निघून जाण्यास सांगितले जाते.

दिवसभर काम करताना एका घरामागे १५ मिनिटे वेळ जातो. याचा दिवसाचा मोबदला १०० रुपये दिला जातो. याचा अर्थ एका घरास केवळ २ रुपये मोबदला दिला जातो. हा अत्यंत कमी आहे, त्यातही कधी कधी तो वेळेवर दिला जात नाही. काम न केल्यास वरिष्ठांकडून कामावरून काढण्यात येईल, असे सांगितले जाते.

Web Title: CoronaVirus News Duty did not fall short; No help from government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.