Join us

CoronaVirus News : आरोग्य विमा कंपन्यांसाठी कोरोना ठरतोय इष्टापत्ती, सामान्यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:35 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनापूर्वी साधारणपणे तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कव्हर असलेली पॉलिसी काढण्याकडे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबांचा कल असायचा

- संदीप शिंदेमुंबई : ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ असे आवाहन दोन महिन्यांपूर्वी करणारे सरकार आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे सांगू लागले आहे. त्यामुळे कोरोना पुढील काही महिनेतरी आपला पिच्छा सोडणार नाही याची खात्री प्रत्येकालाच पटली आहे. त्यातच कोरोनाच्या उपचारासाठी होणाऱ्या खर्चाच्या आकड्यांमुळे अनेकांना धडकी भरली आहे. आपल्यालाही कोरोनाची लागण झाली तर उपचारांचा खर्च कुठून करायचा या भीतीपोटी अनेकांनी आरोग्य विमा काढण्याची लगबग सुरू केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या व्यवसायात मोठी वृद्धी होईल, अशी चिन्हे आहेत.कोरोनापूर्वी साधारणपणे तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कव्हर असलेली पॉलिसी काढण्याकडे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबांचा कल असायचा. मात्र, कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारांच्या खर्चाचे आकडे बघितल्यानंतर ती रक्कमही तोकडी पडेल की काय, अशीभीती वाटू लागली आहे. ठाण्यातील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्याकडे अडीच ते चार लाखांचे कव्हर असलेली पॉलिसी होती. त्यानंतरही उपचारांवर तब्बल ९ लाख रुपये अतिरिक्त खर्च झाले आहेत. कोरोनाची दहशत प्रचंड वाढली असून आरोग्य विम्याची नवी पॉलिसी काढणे, आहे त्या पॉलिसीचे कव्हर वाढवून घेणे किंवा अतिरिक्त पॉलिसी काढण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे. पती-पत्नी आणि दोन मुलांसाठी जर तीन लाख रुपयांपर्यंतची पॉलिसी काढायची असेल तर २० ते ३० हजारांपर्यंतचा प्रीमियम (कंपनी आणि विमाधारकांच्या वयोमानानुसार) आकारला जातो. सध्या अडीच ते तीन लाखांपर्यंतची पॉलिसी घेण्याचे प्रमाण जास्त दिसत आहे. मात्र, आर्थिक कोंडीत अडकलेल्या अनेकांना इच्छा असतानाही प्रीमियमचे पैसे अदा करणे शक्य होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.कामगारांच्या विम्यालाही चालनाछोट्या-मोठ्या उद्योगांना परवानगी देतानाही कामगारांच्या विम्याची सक्ती सरकारने केल्यामुळे कामगारांच्या आरोग्य विम्याला चालना मिळू लागली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये विमा काढलेला असतो. मात्र, सूक्ष्म आणि लघू उद्योगांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाते.आॅनलाइन विम्याकडे कलआॅनलाइन विमा काढणाऱ्यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जात असून सध्याच्या निर्बंधांमुळे तसा विमा काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख कंपन्यांनी कोरोनासाठी विशेष पॉलिसीही जाहीर केली आहे, तर काही कंपन्यांनी फक्त कोरोनासाठी विमा पॉलिसी आणली आहे.साधारणपणे १० कामगारांचा एक लाख रुपयांपर्यंतचे कव्हर असलेला ग्रुप इन्शुरन्स काढायचा असेल तर विविध वयोगटांनुसार १८ ते ४२ हजार रुपयांपर्यंत प्रीमियम भरावा लागतो.कोरोनाच्या धास्तीमुळे पहिल्या दिवसापासून विम्याचे कव्हर अत्यावश्यक असल्याने ती रक्कम २४ हजार ते ५४ हजारांपर्यंत जाते. राज्य कर्मचारी विमा योजनेत सदस्य असले तरी कामगारांचा स्वतंत्र विमा काढायचा का, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

टॅग्स :आरोग्यमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस