CoronaVirus News: महापालिका मुख्यालय, विभाग कार्यालयात प्रवेश बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 02:02 IST2021-04-07T02:02:19+5:302021-04-07T02:02:42+5:30
अंमलबजावणी सुरू; कामानिमित्त आलेले नागरिक परतले माघारी

CoronaVirus News: महापालिका मुख्यालय, विभाग कार्यालयात प्रवेश बंद
मुंबई : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मंत्रालयाप्रमाणेच आता मुंबई महापालिका मुख्यालयासह महापालिकेच्या सर्व खाते व विभाग कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबत सोमवारी परिपत्रक काढल्यानंतर मंगळवारी तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे मुख्यालय व विभाग कार्यालयांमध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांचा प्रवेश नियंत्रित करण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका मुख्यालय, इतर खाते व विभाग कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी वगळून, तातडीची कामे व बैठकांव्यतिरिक्त अन्य कामांसाठी बाहेरील व्यक्तींना कार्यालयात प्रवेश देण्यास मंगळवारपासून बंद करण्यात आले. तर विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका आता प्रत्यक्षात न होता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केल्या जात आहेत.
४८ तासांच्या आतील काेराेना निगेटिव्ह अहवाल आवश्यक
अपवादात्मक परिस्थितीत खातेप्रमुख अथवा विभागप्रमुखांना बाहेरील व्यक्तींना प्रवेश द्यायचा असल्यास, संबंधित व्यक्तींचा ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. कार्यालयीन कर्मचारी अथवा अधिकारी वगळून, इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बैठका या ऑनलाइन घेण्यात येत आहेत. अधिकारी - कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश दिले आहेत
प्रवेशद्वाराजवळच टपाल सेवा
गेल्या वर्षी कोविड काळात महापालिका मुख्यालय, विभाग कार्यालयात दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामांसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी प्रवेशद्वाराजवळ टपाल सेवा व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या हाेत्या. अशीच सुविधा यापुढेही उपलब्ध असेल.