CoronaVirus News: महापालिका आयुक्तांनी घेतली लोकमत रिअ‍ॅलिटी चेकची दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:07 AM2020-06-15T02:07:30+5:302020-06-15T02:07:44+5:30

नियंत्रण कक्षप्रकरण: त्रुटी दूर करण्यासाठी स्वत: घालणार लक्ष

CoronaVirus Municipal Commissioner takes notice of Lokmat Reality Check | CoronaVirus News: महापालिका आयुक्तांनी घेतली लोकमत रिअ‍ॅलिटी चेकची दखल

CoronaVirus News: महापालिका आयुक्तांनी घेतली लोकमत रिअ‍ॅलिटी चेकची दखल

Next

मुंबई : मुंबई महापालिकेने कोरोना बाधितांना विविध रुग्णालयात वेळेत खाट उपलब्ध व्हावी यासाठी विभागीय नियंत्रण कक्ष सुरू केले असून, या नियंत्रण कक्षात कोरोना रुग्णांसाठीच्या उपलब्ध खाटांबाबतची माहिती खरेच मिळते का? याची वस्तुस्थिती लोकमतने रिअ‍ॅलिटी चेकद्वारे रविवारच्या अंकात मांडली. मुंबईतल्या २४ विभागीय नियंत्रण कक्षांपैकी बहुतांश नियंत्रण कक्षात उपलब्ध खाटांबाबत पुरेशी माहिती देण्यात आली नाही. काही नियंत्रण कक्षाकडून प्रश्न शांतपणे ऐकून उत्तरे देण्यात आली. मात्र बहुतांश ठिकाणी माहिती समाधानकारक नसल्याची वस्तुस्थिती लोकमतने रिअ‍ॅलिटी चेकद्वारे मांडली. त्याची दाखल मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतली. या प्रकरणात स्वत: लक्ष घालून त्रुटी असल्यास ती दूर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

इक्बाल सिंह चहल यांच्या व्यतिरिक्त लोकमतने प्रत्येक विभागीय सहायक आयुक्तांशी संपर्क साधला. जी/नॉर्थचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, वॉररूममध्ये संपर्क करणारा रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकाला सर्वतोपरी मदत करण्यावर आमचा भर असतो. आमचे डॉक्टर, अभियंता अथवा अन्य कर्मचारी रुग्णांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. पी/उत्तरचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितले की, वॉररूमच्या साहाय्याने आम्ही रुग्णाला तात्काळ मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आमची टीमही तितकीच सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रिस्पॉन्स टाइममध्ये चांगला बदल झाला आहे. दरम्यान, आपण वॉर्डनिहाय वस्तुस्थिती मांडल्याबाबत मी आपले आभार मानतो. पी/दक्षिणचे सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांनी दूरध्वनी घेतला नाही. मात्र कॅन यू प्लीज एसएमएस इफ एनिथिंग अर्जंट? असा मेसेज केला. त्यावर त्यांना माहिती दिली असता त्यांनी पी दक्षिणच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. नितेश ठाकूर यांचा मोबाइल क्रमांक पाठवला. मात्र याबाबत या विभागात कोणाचीच प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

बी वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन आर्ते यांना परिस्थिती सांगितल्यानंतर डॅश बोर्ड नुकताच सुरू झाल्याने सगळी माहिती अपडेट व्हायला थोडा वेळ लागणार असल्याची त्यांनी माहिती दिली. मात्र रुग्णाची पूर्ण माहिती मिळाल्यास त्याला आवश्यक बेड पुरविण्याची सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. इ वॉर्डच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांना कॉल केला असता त्यांनी तो उचलला नाही. दरम्यान, त्यांना याबाबत मेसेज टाकूनही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही प्रतिसाद आला नाही.

एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त सुधांशू द्विवेदी यांनी सांगितले की, कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एम पूर्व विभागात खाटांच्या उपलब्धतेबाबत मी दररोज लक्ष घालत असतो. शताब्दी रुग्णालय हे एम पूर्व विभागाच्या हद्दीत असणारे पालिकेचे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी दररोज खाटा उपलब्ध करून दिल्या जातात. आजही या रुग्णालयात ३०हून अधिक खाटा उपलब्ध आहेत. तसेच विभागातील खाजगी रुग्णालयातही ५०हून अधिक खाटा उपलब्ध आहेत. उपलब्ध खाटांची संख्या दररोज वाढते किंवा कमी होते. याचप्रमाणे रुग्णांसाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

डी वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, सुमारे ३ लाख ६० हजार लोकसंख्या असलेल्या या वॉर्डमध्ये वॉररूमचे काम तीन शिफ्टमध्ये सुरू असते. वॉररूमचे काम गेल्या सोमवारपासून सुरू आहे.  पालिका रुग्णांच्या दारी अशा संकल्पनेनुसार या वॉर्डमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपलब्ध माहितीनुसार सकाळी ८ पासून कोरोना रुग्णांच्या घरी संपर्क साधला जातो. या वॉररूममध्ये १० शिक्षक कार्यरत आहेत. या वॉर्डच्या टेलिफोन नंबरला १० लाइन्स जोडल्या आहेत. रोज लिस्टप्रमाणे सुमारे ५० आणि बाहेरून वॉररूमशी संपर्क साधणारे २० कॉल अशा ७० कॉलद्वारे आम्ही संपर्क साधतो. कोरोना रुग्णांच्या घरी आमचा फिल्डची टीम जाते. या टीममध्ये रुग्णवाहिकेसह १ डॉक्टर, १ नर्स, २ कर्मचारी यांची टीम कार्यरत असते. १० टीम कार्यरत आहेत. हॉस्पिटलमध्ये बेडच्या उपलब्धतेनुसार रुग्णांना दाखल करण्याचे काम आमची टीम करते. तर कोरोना रुग्णांच्या कुटुंबांना या वॉर्डमध्ये असलेल्या २१ क्वारंटाइन सेंटरमध्ये त्यांना क्वारंटाइन केले जाते. सध्या या वॉर्डमध्ये क्वारंटाइन क्षमता ११०० असून ५०० ते ५५० नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

के पश्चिमचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची वॉररूम चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. याची पोचपावती लोकमतने चांगल्या प्रकारे मांडली आहे. लवकरच नागरिकांना वॉर्डमध्ये डिजिटल फलकाद्वारे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेड आणि अन्य माहिती देण्यात येईल. के पूर्वचे सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी सांगितले की, पालिका प्रशासन सातत्याने कामात सुधारणा करत असून रुग्णांना सुविधा पोहोचवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर सतत कार्यरत आहे. या वॉररूमची माहिती देऊन लोकमतने पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेतली आहे.
एम पश्चिमचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, एम पश्चिम वॉर्डमध्ये सर्व व्यवस्था सुरळीत आहे. पुरेसे बेड उपलब्ध असतात इतकेच नव्हे गेल्या चार-पाच दिवसात ५० ते ६० बेड रिकामे असतात. चेंबूरमध्ये एसआरबी, सुराणा, कोळेकर या रुग्णालयांना ८० टक्के जागा राखीव ठेवायची नोटीस दिली आहे. पूर्वी कोरोना रुग्णाबाबत १९१६वर कॉल जात होता. परंतु आता प्रत्येक वॉर्डला वॉररूम तयार केली आहे. सकाळी आठ वाजता पॉझिटिव्ह रुग्णाची यादी येते. एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्याच्या घरी जाऊन तपासणी केली जाते. पालिकेच्या रुग्णालयात किंवा पालिकेच्या जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये पाठविले जाते. केवळ रुग्ण सांगतात म्हणुन त्यांना अ‍ॅडमिट करता येत नाही. कारण जो खरा गरजू आहे त्याला बेड उपलब्ध व्हायला हवा.

कोरोना बाधित रुग्णांना खाटा मिळत नसल्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने वॉर्ड स्तरावर वॉर रुम सुरू केला. या कक्षातील विशेष हेल्प लाईन क्रमांकांवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क करण्यासही सुरुवात केली. मात्र उपलब्ध खाटांबद्दल माहिती देण्यास अद्याप काही विभागांमधील यंत्रणा सक्षम नसल्याची वस्तुस्थिती लोकमतने रिअ‍ॅलिटी चेकद्वारे मांडली. लोकमतने रिअ‍ॅलिटी चेकद्वारे मांडलेली वस्तुस्थिती पाहत इकबाल सिंह चहल यांनी याबाबतची माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधीशी संपर्क साधला. मांडलेली वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतली. माहिती देऊ न शकलेल्या विभागांची यादी त्यांनी लोकमतकडून मागवली. तसेच या प्रकरणात स्वत: लक्ष घालून त्रुटी असल्यास ती दूर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टी विभागाच्या सहाय्यक आयुक्तानाही कोरोनाची बाधा झाल्याने एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडे टी विभागाचाही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येवू शकले नाही. एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळुज यांच्याशी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: CoronaVirus Municipal Commissioner takes notice of Lokmat Reality Check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.