Join us

Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 18:50 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पालिकेने १ एप्रिल ते १५ जून २०२१ या काळात लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण केले होते.

मुंबई - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. मात्र महापालिकेने नुकत्याच केलेल्या तिसऱ्या सेरो सर्व्हेक्षणातून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ ते १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्ये सरासरी ५१.१८ टक्के प्रतिपिंड(अँटीबॉडिज) असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. 

दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पालिकेने १ एप्रिल ते १५ जून २०२१ या काळात लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण केले होते. वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चाचणी करण्याकरीता संपूर्ण मुंबईतून आलेल्या रक्त नमुन्यांमधून विभागनिहाय नमुने घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.   

असे झाले सर्वेक्षण....

सर्व २४ प्रशासकीय विभागातील दोन हजार १७६ रक्त नमुने वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. या रक्त नमुन्यांची प्राथमिक चाचणी केल्यानंतर प्रतिपिंडांसंदर्भातील चाचणी करण्यासाठी हे सर्व रक्त नमुने कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीवनिदान वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.

सर्वेक्षणातून दिलासा....

सेरो सर्वेक्षणातून मुंबईतील ५१.१८ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. यापैकी पालिकेच्या प्रयोगशाळातील ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळातील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आहेत. तर १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळून. मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्ये ३९.०४ टक्के प्रतिपिंडे आढळली होती. म्हणजेच ५० टक्के लहान मुलांना यापूर्वीच कोविडची बाधा झाली अथवा ते विषाणूच्या सान्निध्यात आल्याचे समोर आले आहे.

वयोगट....प्रतिपिंडे(आकडेवारी टक्क्यांमध्ये)

१ ते ४ ....५१.०४

५ ते ९....४७.३३

१० ते १४...५३.४३

१५ ते १८....५१.३९

यांनी तयार केला अहवाल....

सेरो सर्वेक्षणाचा अभ्यास आणि निष्कर्ष नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या गृह अधिकारी डॉ. गार्गी काकाणी यांची मुख्य अन्वेषक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ. सुरभी राठी आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सची अग्रवाल यांनी सह अन्वेषक म्हणून योगदान दिले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामुंबई