Join us

Coronavirus: मुंबई सावरतेय! काेरोना पॉझिटिव्हिटी रेट घटला; कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही ९२ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 06:59 IST

एप्रिलच्या सुरुवातीला मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट हा २०.८ टक्के होता, तर अखेरीस तो ९.९ टक्क्यांवर आला.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून हळूहळू मुंबई सावरत असल्याचे दिसते आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर शहर उपनगरातील पॉझिटिव्हिटी रेट १९ टक्क्यांवर होता. सध्या हा रेट ६.५७ टक्के इतका आहे. म्हणजे महिनाभरात पॉझिटिव्हिटी रेट जवळपास १३ टक्क्यांनी कमी झाला. मुंबईकरांसाठी हे दिलासादायक चित्र आहे.

१४ एप्रिल रोजी मुंबईत ८७ हजार ४४३ सक्रिय रुग्णांची नोंद होती, तर रुग्ण बरे होण्याचा रेट हा ८१ टक्के होता. सध्या मुंबईत ३७ हजार ६५६ सक्रिय रुग्ण असून बरे होण्याचा रेट हा ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पालिका प्रशासनाने चार जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली असून यामुळे सहा हजार खाटांची भर पडणार आहे, तर अतिदक्षता विभागात १५०० खाटाही वाढणार आहेत.

एप्रिलच्या सुरुवातीला मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट हा २०.८ टक्के होता, तर अखेरीस तो ९.९ टक्क्यांवर आला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिवसाला केवळ १८-२० हजार चाचण्या व्हायच्या, मात्र दुसऱ्या लाटेत यात वाढ करून हे प्रमाण दिवसाला ४०-५० हजारांवर करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत गेल्यानंतर त्वरित पालिका प्रशासनाने १२ हजार खाटांवरून २३ हजार खाटांची उपलब्धता निर्माण केली. त्याशिवाय, शोध, चाचण्या, निदान, उपचार यावर भर दिला. तसेच, मृत्युदर कमी करण्यासाठी अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींवर विशेष लक्ष दिले. सध्या मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांत अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली आणि मालाड येथील रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे.

मुंबईतील रविवारच्या आकडेवारीनुसार २४ तासांत एक हजार ५४४ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दोन हजार ४३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या सहा लाख ८८ हजार ६९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार २६० जणांचा मृत्यू झाला असून, सहा लाख ३६ हजार ७५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या