मुंबई : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी मुंबईकर सिद्ध असल्याची ग्वाहीच रविवारच्या जनता कर्फ्यूने दिली. एरवी वाहतूककोंडीत हरवलेले रस्ते आज मोकळे होते. मरिन लाइन्सपासून विविध उपनगरांतील गर्दीची ठिकाणे अक्षरश: निर्मनुष्य होती. या अभूतपूर्व शांततेचे अनुभव अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला. मुंबईकर घरी थांबले असले, तरी सफाई कर्मचारी, पोलीस दल, रुग्णालये आणि वीज विभाग कार्यरत होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच त्याची प्रचिती पाहायला मिळाली. भल्या पहाटेपासून पेपर टाकण्याची लगबग असणारे वृत्तपत्र विक्रेत्यांनी सातपूर्वीच पेपर टाकण्याचे काम संपेल, याची दक्षता घेतली. मरिन लाइन्स, शिवाजी पार्क, वरळी सी-फेस, पाच उद्यान अशा ठिकाणी मॉर्निंग वॉक, व्यायाम, योगाभ्यासासह गप्पांचा फड रंगविणाऱ्या व्यक्ती आणि समूहांनी आज घरीच थांबणे पसंद केले. अनेकांनी घरातील योगाभ्यासाचे फोटो सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे एरवी लोकांच्या गर्दीने गजबजलेली ही ठिकाणे आज अक्षरश: निर्मनुष्य होती.मुंबईतील रस्त्या-रस्त्यांवर पोलीस आणि अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकच पाहायला मिळत होते. जनता कर्फ्यूतही रस्त्यावर, परिसरात रेंगाळणाºया अपवादात्मक लोकांना पोलीस हटकत होते. रेल्वे स्टेशनवर अत्यावश्यक सेवेतील लोकांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जात होता. काही ठिकाणी थर्मल स्कॅनिंगही केले जात होते.सायंकाळी पाच वाजता टाळ्या वाजवत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल आभार व्यक्त करण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गॅलरीत, गच्चीत उभे राहून लोकांनी टाळा, थाळ्या वाजवत आपल्या भावना प्रकट केल्या, तर अनेकांनी शंखनाद करत कोरोनाविरोधातील युद्धात मुंबईकर सज्ज असल्याचीच ग्वाही दिली.
Coronavirus : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी मुंबईकर सज्ज; घेतला शांततेचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 06:07 IST