Join us  

CoronaVirus In Mumbai: विनामास्क कारवाईसाठी पोलिसांना 25 हजारांचे टार्गेट; महापालिकेला मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 2:48 AM

महापालिकेला मदत, प्रत्येक ठाण्याला पाच पुस्तके

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालिकेकड़ून विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असताना, आता पोलीसही त्यांच्या दिमतीला उतरले आहेत. यात पालिकेचे दंड वसूल करणारे पुस्तक पोलिसांच्या हाती देण्यात आले आहे. त्यानुसार चौकाचौकात उभे राहून पोलीसही रविवारपासून कारवाई करताना दिसून आले.

प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत पाच पुस्तकांचे टार्गेट देण्यात आले आहे. मुंबईतल्या एकूण ९४ पोलीस ठाण्यात हे पुस्तक देण्यात आले असून, दिवसाला २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे टार्गेट प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत देण्यात आले आहे. मुंबईत २० मार्च २०२० ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबई पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध  ११ हजार ७१५ गुन्हे नोंद केले आहेत. यात, कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्यामुळे पालिकेकड़ून विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे. त्यात क्लीनअप मार्शलही ठिकठिकाणी तैनात आहेत.यातच विविध बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या हातात पालिकेचे दंड वसूल करणारे पावती पुस्तक देत त्यांना कारवाईसाठी रिंगणात उतरविण्यात आले आहे.      

 रविवार असल्याने नागरिकांची गर्दी कमी होती. अशात पोलिसांची धांंदल उडाली. रात्री ९ वाजेपर्यंत याचा अहवाल वरिष्ठांना द्यायचा असल्याने हातात बुक घेऊन कुठे थांबायचे? असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसला. मुंबई पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या आदेशाने ही कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  त्यामुळे नाकावरचा मास्क खाली आला तरी नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही रस्त्यावर कडक कारवाईसाठी उतरले आहेत. 

मास्कचे महत्त्व पटवून देण्यासाठी दंड 

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आता मास्क न घालणाऱ्याकड़ून अधिकृतरीत्या चलन वसूल करणाऱ आहेत. यापूर्वी विनाहेल्मेट आणि सीट बेल्ट न घालणाऱ्यांवर  दंडात्मक कारवाई करत सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. आता मास्क सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिसमुंबई महानगरपालिका