Join us  

coronavirus: मास्क दरनियंत्रणाचा निर्णय कागदावरच! जुन्याच दराने विक्री; कारवाई करण्याचे आदेश

By अतुल कुलकर्णी | Published: October 31, 2020 6:58 AM

Mask Price News : राज्य सरकारने आदेश काढून मास्कच्या किंमतीवर नियंत्रण आणले असले तरी राज्यात एकाही ठिकाणी औषध दुकानाच्या दर्शनी भागावर मास्कच्या किमती लावण्यात आलेल्या नाहीत.

- अतुल कुलकर्णी  मुंबई : राज्य सरकारने आदेश काढून मास्कच्या किंमतीवर नियंत्रण आणले असले तरी राज्यात एकाही ठिकाणी औषध दुकानाच्या दर्शनी भागावर मास्कच्या किमती लावण्यात आलेल्या नाहीत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी हातावर हात ठेवून जनतेची होत असलेली लूट बघत बसले आहेत. आदेश निघून बरोबर १० दिवस झाले मात्र कोणीही किंमत कमी करायला तयार नाही. राज्यात शासन आदेशाची अंमलबजावणी न करणाºया एकाही दुकानदारावर एफडीएच्या अधिकाºयांनी आजपर्यंत  कारवाई केलेली नाही.लोकमतने मास्कच्या किमतीवरुन वृत्तमालिका केली होती. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांंनी मंत्रिमंडळात पाठपुरावा करून दर नियंत्रणाचा आदेश काढला.मात्र दरनियंत्राच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर  टोपे म्हणाले, सरकारने हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला आहे, त्याचे जर पालन होत नसेल तर सरकार कठोर कारवाई करेल. जनतेची लूट करणाºया दुकानदारांवर अधिकारी कारवाई करणार नसतील तर अधिका-यांवरच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, पुणे, नाशिक,  मुंबई, जळगाव या ठिकाणी लोकमतच्या टीमने रियालिटी चेक केला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक जिल्ह्यातल्या दुकानदारांनी तर असा निर्णय झाला असल्याचे माहितीच नाही असे सांगत हात वरती केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपवण्यात आली असून या विभागाने राज्यस्तरावर काही तक्रारी आल्यास त्याचे निवारण करावे असे आदेशात नमूद केले आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी दूर करण्याच अधिकार देण्यात आले आहेत. मात्र कोणीही या लक्ष घालायला तयार नाही. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी संपर्क साधला पण ते उपलब्ध झाले नाहीत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआरोग्यमहाराष्ट्र सरकार