Join us

आरोग्य सुविधा कमी पडत असल्याने लॉकडाऊनचे नियोजन करा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:59 IST

Coronavirus in Maharashtra : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेडस् व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

मुंबई : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेडस् व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा, यावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सूचना प्रशासनास देण्यात येत आहेत तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले.

- ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटांपैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत.- ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटांपैकी १२ हजार ७०१ खाटा, १९ हजार ९३० खाटांपैकी ८ हजार ३४२ खाटा भरल्या आहेत. - ९ हजार ३० व्हेंटिलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना  ठेवले आहे.

बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडताहेतआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन ते सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई