CoronaVirus Lockdown News: मुंबईत रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी लागू; नाकाबंदीसह पाेलिसांची गस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:17 IST2021-04-06T04:06:48+5:302021-04-06T07:17:20+5:30
प्रवासासाठी घ्यावी लागणार स्थानिक पोलीस उपायुक्तांंची परवानगी

CoronaVirus Lockdown News: मुंबईत रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी लागू; नाकाबंदीसह पाेलिसांची गस्त
मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने रविवारी याबाबत नवीन निर्बंध जारी केले. त्यानुसार आता मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केले आहे. यात, रात्रीच्या वेळी संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचे आदेश लागू राहतील. पोलीस उपायुक्त चैतन्या एस. यांनी हे आदेश काढले असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून ते ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध कायम असतील.
या काळात नागरिकांनी परवानगीशिवाय घराबाहेर पडू नये. तर, सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमू किंवा गर्दी करू नये. रात्री संचारबंदी असल्याने कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.
नियमांचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. तसेच या दरम्यान प्रवासाच्या परवानगीसाठी स्थानिक पोलीस उपायुक्तांंना जबाबदारी देण्यात आली आहे.
ई-पाससाठी सहायक आयुक्तांकडे करावा लागणार अर्ज
ई-पाससाठी सहायक आयुक्तांकडे अर्ज करावा लागणार आहे. या संचारबंदी आणि जमावबंदी आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि त्यातील कर्मचारी, अन्नपदार्थ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, रुग्णालये, मेडिकल आणि अन्य अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. तसेच पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पाेलीस गस्त घालणार असून समुद्रकिनारे, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
जनतेने सहकार्य करावे; पोलीस आयुक्तांचे आवाहन
निर्बंध असेल तरी लोक घराबाहेर पडतात. पोलिसांनी हटकले तर हुज्जत घालतात. पोलिसांकडून गस्तीवर विशेष भर असणार आहे. जनतेनेही सहकार्य करत नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.