CoronaVirus Live Updates : कोविड रुग्णालयातील ७५ टक्के खाटा रिक्त; जाणून घ्या सद्यस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 19:24 IST2021-06-22T19:23:17+5:302021-06-22T19:24:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : मार्च ते मे या महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचला होता.

CoronaVirus Live Updates : कोविड रुग्णालयातील ७५ टक्के खाटा रिक्त; जाणून घ्या सद्यस्थिती
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. दररोजच्या बाधित रुग्णांचा आकडाही सहाशेपर्यंत खाली आला आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्याही आता १४ हजार ४५३ एवढी आहे. त्यामुळे पालिका व खासगी रुग्णालये व कोविड केंद्रांमध्ये राखीव खाटांपैकी १६ हजार २७१ म्हणजेच ७५ टक्के खाटा आता रिकाम्या आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. मार्च ते मे या महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचला होता. त्यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र कडक निर्बंध, वेगाने लसीकरण आणि संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आता प्रभाव दिसून येत आहे.
दोन महिन्यांपूर्वी मुंबईत दररोज सरासरी नऊ ते दहा हजार बाधित रुग्णांची नोंद होत होती. मात्र आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे दररोज सरासरी पाचशे ते सातशे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०९ टक्के एवढा आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही आता ७२२ दिवसांवर पोहोचला आहे. बहुतांशी विभागात रुग्ण वाढीचा दर यापेक्षा कमी आहे.
आयसीयू १२४१, व्हेंटिलेटर ५३८ खाटा उपलब्ध
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अतिदक्षता विभागातील खाटांची मागणी वाढली होती. त्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत होती. तसेच व्हेंटिलेटर खाटांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत होता. मात्र आता रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यामुळे अतिदक्षता विभागात १२४१ खाटा तर व्हेंटिलेटरच्या ५३८ खाटा रिकाम्या आहेत.
अशी आहेत सद्यस्थिती...
प्रकार उपलब्ध खाटा... दाखल रुग्ण... रिक्त
साधारण खाटा १७९७२ ... २९४२ ..१५०३०
अति दक्षता २६३६... १३९५.... १२४१
ऑक्सिजन १०९०९ .... १७७१..... ९१३८
व्हेंटिलेटर १४५४ ... ८९६ ..... ५५८