CoronaVirus Jogeshwari teacher hirave donated blood 29 times | सामाजिक जाणीव ठेवून २९ वेळा रक्तदान करणारे जोगेश्वरीचे

सामाजिक जाणीव ठेवून २९ वेळा रक्तदान करणारे जोगेश्वरीचे

मनोहर कुंभेजकर
मुंबई--कोरोनाग्रस्तांना सध्या रक्त पुरवठ्याची गरज असून रक्तदान करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केला आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत जोगेश्वरी (पूर्व) विभागात राहणारे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे सर यांनी आज सकाळी २९ वे रक्तदान केले.

वांद्रे (पूर्व )येथील सेंट टेसेसा हायस्कूल येथे ते मराठीचे शिक्षक आहेत.आपला  शिक्षकी पेक्षा सांभाळून आणि रक्तदानाचे महत्व  ओळखून त्यांनी आतापर्यंत स्वतः २९ वेळा रक्तदान केले आहे.आज सकाळी जोगेश्वरी (पूर्व),सुभाष नगर फ्रान्सिसवाडी मित्र मंडळाने आयोजित रक्तदान शिबीरात त्यांनी रक्तदान केले. २० वर्षांपूर्वी पहिल्यांदा रक्तदान केले होते,आणि वर्षांतून किमान २ ते ३ वेळा रक्तदान करतो अशी माहिती गणेश हिरवे यांनी लोकमतला दिली.

दैनंदिन व्यापातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासणे व समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हा त्यांचा स्थायीभाव असून
पत्रलेखनाच्या माध्यमातून आपले सामाजिक जीवन सुरू करणाऱ्या हिरवे सरांचा मूळ पेशा शिक्षकी आहे. ज्ञानदानातील अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.सामाजिक कार्य व पत्रलेखनासाठी त्यांना आजवर ७५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आज सोशल मीडियाच्या जमान्यात वाचनाची आवड जोपासता यावी यासाठी स्वतः पदरमोड करून त्यांनी आतापर्यंत समाजातील विविध नागरिकांना बारा हजारांहून अधिक गोष्टींची पुस्तके भेट म्हणून मोफत दिलेली आहेत.

जोगेश्वरी येथे वास्तव्य करणारे हिरवे सर परिसरातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक, राजकीय व क्रीडाविषयक उपक्रमांत हिरीरीने सहभाग घेतात त्यामुळेच त्यांचा जनसंपर्कदेखील खूप दांडगा आहे. माणसे जोडण्याचा त्यांना मोठा छंद आहे. 

निस्वार्थी भावनेने समाजकार्य करणारी अनेक माणसे त्यांनी आपल्या जॉय ऑफ गिव्हिंग या सोशल माध्यमातील ग्रुपद्वारे व संस्थेद्वारे जोडलीत ज्यांच्या माध्यमातून त्यांनी अनाथ, वृद्ध, गरीब लोकांसाठी अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत.तर सामाजिक बांधीलकीतून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून लोकवर्गणीतून व प्रसंगी स्वतःची पदरमोड करून त्यांनी गरजूंना मदत केली आहे.

Web Title: CoronaVirus Jogeshwari teacher hirave donated blood 29 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.