मुंबई : सायन, केईएम, कूपरसारख्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह पडून असल्याच्या घटना ताज्या असताना, आता एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या प्रकरणी रुग्णालय, महापालिका आणि प्रशासन यावर खरपूस टीका केली जात असून, अशा व्हिडीओंबाबत प्रशासन मात्र काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने गोंधळात भरच पडत आहे. तर दुसरीकडे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयावरील ताण वाढत आहे. परिणामी, रुग्णांचे हाल होत आहेत.सायन रुग्णालयात रुग्णांवर मृतदेहांशेजारीच उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आमदार नीतेश राणे यांनी हा व्हिडीओ टिष्ट्वट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वेळी सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ही घटना घडते तोवर सायन रुग्णालयातून ३ मे रोजीच्या रात्री ९.२५ वाजता वॉर्ड क्रमांक ५ येथील समोरील जाळीच्या खिडकीमधून कोरोना संशयित रुग्णाने उडी मारत पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला सुरक्षारक्षकांनी पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हे थांबत नाही तोवर आता सायन रुग्णालयातील आणखी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये एका बेडवर दोन रुग्ण दिसत आहेत. तर काही जण जमिनीवर आहेत. दरम्यान, मुळात रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयांवर ताण येतो आहे. रुग्णांना रुग्णलयात दाखल करून घेतले नाही तर नातेवाईक चिडतात. त्यामुळे समस्या आणखी वाढते आहे. केवळ महापालिका नाही तर सरकारी रुग्णालयांमध्येही हीच अवस्था असून, आता याबाबत नवनियुक्त आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यामुळे वाढतोय रुग्णालयांवरील ताणसायन रुग्णालयात कुर्ला, घाटकोपर, धारावीसह चेंबूर, मानखुर्द अशा लगतच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत असतात. या रुग्णाव्यतिरिक्त सातत्याने मुंबईबाहेरूनदेखील या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण दाखल होत असतात. आता तर कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, सर्वच रुग्णालयांवर मोठा ताण येतो आहे. परिणामी, रुग्णांची संख्या वाढत असून, रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा रुग्णांचा आकडा अधिक होत आहे. परिणामी, रुग्णालयात दाखल करण्यात येत असलेल्या रुग्णांची सेवा कशी करायची. त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या? अशा अनेक प्रश्नांनी रुग्णालयांसह महापालिका प्रशासनाला ग्रासले आहे.
coronavirus: वाढत्या रुग्णसंख्येमुळे वाढला रुग्णालयांवर ताण, रुग्णांचे हाल सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 07:22 IST