Join us

coronavirus : कोरोना रुग्णांवर होमिओपॅथीचे उपचार सकारात्मक, आयुष मंत्रालयाकडून संशोधनाला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 20:56 IST

लक्षणपरत्वे उपचारास प्राधान्य असलेली होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या दिशेने संशोधनात्मक प्रवास सुरु झाला आहे.

- स्नेहा मोरे मुंबई – कोरोनावर आजपर्यंत लस, औषधी विकसित होऊ शकलेली नाही. तरीही, लक्षणांनुसार उपचार होत असून त्यातून अनेक रुग्ण बरेही होत आहे. याच आधारे व्यक्ती व त्यातील लक्षणपरत्वे उपचारास प्राधान्य असलेली होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या दिशेने संशोधनात्मक प्रवास सुरु झाला आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात होमिओपॅथी तज्ज्ञांच्या चमूद्वारे काही रुग्णांवर होमिओपॅथीचे उपचार सुरु आहेत. या उपचारपद्धतींत अधिक संशोधन व्हावे याकरिता आयुष मंत्रालयानेही मान्यता दिली असल्याने कोरोनाच्या सावटात आता आशेचा किरण दिसू लागला आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आरोग्य सेवा तथा संचालक आयुक्त डॉ. अनूप कुमार यादव यांनी सांगितले, केंद्र शासनाने याविषयी मान्यता दिली आहे त्यामुळे ही संशोधन प्रक्रिया सुरु आहे. होमिओपॅथी अशाप्रकारच्या विषाणूजन्य रोगावरील नियंत्रणासाठी (viral infection) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. कोरोना (कोविड-१९) संसर्गावर उपचार करताना नेमकी हीच पद्धती वापरणे योग्य ठरेल. होमिओपॅथीत रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी ठराविक औषध आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयात २४ कोरोना (कोविड-१९) रुग्णांवर होमिओपॅथीचे उपचार सुरु आहेत. या उपचार प्रक्रियेत होमिओपॅथीची चार गोळ्या दिवसांसून तीन वेळा देण्यात येतात. यातून कोरोना रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून येत आहे. या उपचार प्रक्रियेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वापरली जात आहे. होमिओपॅथीच्या उपचारांविषयी केंद्र शासनाच्या सेंट्रल काऊन्सिल आफ होमिओपॅथी यांना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कळविले आहे. 

याविषयी, ज्येष्ठ होमिओपॅथी व अॅलोपॅथीतज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांनी सांगितले, कोरोनाच्या आजारात रक्तवाहिन्यांवर महत्त्वाचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रुग्णांची प्रकृती खालावण्याची भीती असते, मात्र या औषधांमुळे रुग्णांची प्रकृती सुधारणा होत आहे. कोरोनावरील लसीच्या संशोधनाला अद्याप यश आलेले नाही. तरीही या संसर्गजन्य रोगाच्या लक्षणांचे स्वरूप पाहून रुग्णावर उपचार केले जात आहेत. याच पद्धतीने काही रुग्ण बरेही होत असून देशात अशा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. असे असले तरी, या उपचारांपेक्षाही प्रभावी उपचार झाल्यास कोरोना संसर्गाचा मृत्यूदर आणखी घटेल. आणि त्यासाठीच देशभरातील तज्ज्ञ होमिओपॅथीचा पर्याय सातत्याने सुचवित आहेत, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणारा हा संशोधनाचा प्रयोग अत्यंत आशादायी आहे.

आयुर्वेद, होमिओपॅथी संशोधनाला हिरवा कंदील

आयुष मंत्रालयाने कोरोना (कोविड-१९) वर आयुर्वेद, होमिओपॅथी शाखेतील उपचारांच्या संशोधनाला मान्यता दिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा स्वरुपाचे संशोधन करण्यास केंद्राकडून मान्यता दिली असून याविषयी आयुष मंत्रालयाला मात्र आधी सूचित कऱणे बंधनकारक आहे. यात कोणत्या  स्वरुपाचे उपचार, कोणती औषधे याविषयीच्या सविस्तर माहितीचा यात समावेश असल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसऔषधं