Join us

Coronavirus: मुंबईला मोठ्ठा दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट, दिवसभरात २२ हजारांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 19:58 IST

Coronavirus In Mumbai: कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ३१७ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकच दिवशी तब्बल २२ हजार ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 मुंबई - कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ३१७ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकच दिवशी तब्बल २२ हजार ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये १६.८ टक्केच खाटा भरल्या आहेत. मात्र मृत्यूचा आकडा मागील काही दिवसांत वाढताना दिसून येत आहे.

मुंबईत आतापर्यंत नऊ लाख ८१ हजार ३०६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८९ टक्के रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. शुक्रवारी बाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी नऊ हजार ५०६ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तर लक्षणे असलेले एकूण सहा हजार ४३२ रुग्ण सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यापैकी एकूण दोन हजार ८२४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र वाढले आहे. त्यामुळे आतापर्यंत आठ लाख ७७ हजार ८८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८४ हजार ३५२ सक्रीय रुग्ण आहेत.

मृतांच्या संख्येत वाढ...सेव्ह लाईफ मिशनच्या माध्यमातून महापालिकेने कोविड मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणले आहे. आतापर्यंत आठवेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर दररोज दोन ते तीन मृत्यू होत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा किंचित वाढला आहे. शुक्रवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा रुग्ण पुरुष व तीन रुग्ण महिला होत्या. यापैकी सात रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर सहा रुग्णांचे वय ६० वर्षांवर आणि ४० वर्षांवरील दोन रुग्णांचा समावेश होता. तर एक रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होता. आतापर्यंत एकूण १६ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोविड चाचणीत घट...मागील काही दिवसांमध्ये महापालिकेने कोविड चाचणीचे प्रमाण वाढवले होते. त्यामुळे एका दिवसात ७२ हजार चाचण्यादेखील करण्यात आल्या होत्या. मात्र शुक्रवारी चाचण्यांचे प्रमाण ५४ हजार ९२४ एवढे होते. आतापर्यंत एकूण एक कोटी ४५ लाख १० हजार ४३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर १.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण संख्या ३९ दिवसांमध्ये दुप्पट होत आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई