coronavirus : मोबाइल कंपन्यांना येणार ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:44 IST2020-04-27T01:44:24+5:302020-04-27T01:44:34+5:30

सर्वच उद्योगांवर संकट कोसळणार असले तरी मोबाइलच्या मागणीमध्ये घसरण होणार नाही, असे निरीक्षण इंडिया सेल्युलर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनने (आयसीईए) नोंदविले आहे.

coronavirus : 'Good days' for mobile companies | coronavirus : मोबाइल कंपन्यांना येणार ‘अच्छे दिन’

coronavirus : मोबाइल कंपन्यांना येणार ‘अच्छे दिन’

मुंबई : मोबाइल हॅण्डसेटचे उत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्यांना पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. परंतु, कोरोनानंतरच्या आर्थिक अरिष्टामुळे जवळपास सर्वच उद्योगांवर संकट कोसळणार असले तरी मोबाइलच्या मागणीमध्ये घसरण होणार नाही, असे निरीक्षण इंडिया सेल्युलर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनने (आयसीईए) नोंदविले आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे यापुढे सर्वच आघाड्यांवरील संस्कृती बदलणार आहे. त्यासाठी मोबाइलची मागणी वाढेल असा तर्क त्यासाठी मांडण्यात आला आहे.
भारतात गेल्या वर्षी १५ कोटी ८० लाख मोबाइल फोनची विक्री झाली होती. अमेरिकेला मागे टाकून भारताने चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक पटकावला होता. २०१९ सालातील जानेवारी ते मार्च या तिमाहीतील मोबाइल विक्रीची तुलना यंदाच्या जानेवारी आणि मार्च महिन्याशी केल्यास त्यात ४ टक्के घट झाली आहे. केवळ लॉकडाउनच्या कालावधीतच नव्हे तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही थोडीफार घट नोंदवण्यात आली होती. लॉकडाउनच्या काळात उत्पादनासह खरेदी-विक्रीसुद्धा बंद होती. त्याचा मोठा फटका मोबाइल कंपन्यांना बसला आहे. परंतु, हा कालावधी संपल्यानंतर उत्पादन प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
लॉकडाउनच्या काळात बहुसंख्य लोक वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत होते. शाळा बंद असल्याने आॅनलाइन पद्धतीने धडे गिरवले जात होते. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आॅनलाइन अ‍ॅपचा वापर वाढला होता. तर मनोरंजनासह कार्यालयीन बैठकासुद्धा त्याच पद्धतीने होत होत्या. अनेक चर्चासत्रांना (वेबिनार) हजारो लोकांनी घरात बसून हजेरी लावली. त्यामुळे मोबाइलचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भविष्यातील सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधामुळे मोबाइलची गरज वाढेल़
>मोबाइल किमतीत वाढ : मोबाइलवरील जीएसटी १२ वरून १८ टक्के करण्यात आल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या मोबाइल हॅण्डसेटच्या किमती १ एप्रिलपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १० हजार रुपये किमतीपर्यंतच्या स्मार्टफोनच्या मागणीत वाढ होईल, असे सांगितले जात असले तरी मध्यम किमतीच्या फोनच्या विक्रीत वाढ होण्याबाबत मात्र साशंकता आहे.

Web Title: coronavirus : 'Good days' for mobile companies