Join us  

CoronaVirus : आधी कोरोना किटची निर्मिती केली, मग बाळाला दिला जन्म; कर्तृत्ववान डॉक्टरांसमोर आव्हाड नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:56 PM

भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लागला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्या महिलेचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

मुंबई : पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली आहेत. पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे हे किट्स तयार करण्यासाठी महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं अमूल्य योगदान आहे. मिनल भोसले मायलॅब या फार्मा कंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमनेच भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लावला आहे. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते, अशा भावना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(ICMR)नंही या स्वदेशी किट्सला मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ही किट बनवण्यात आली असून, त्याला देशातल्या FDA आणि  Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) या संस्थांनीही परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी दिली. अतिशय कमी किमतीत ही कीट तयार करण्यात आली असून, त्यासाठी फार कालावधीसुद्धा लागलेला नाही. पुण्यातल्या Mylab Discovery Solutions Pvt Ltd या कंपनीने ही किट तयार केलेली आहेत. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून, अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी बनवल्या आहेत. प्रसूतीनंतर मिनल भोसलेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचा आणीबाणीचा काळ आहे. त्यामुळे या काळात मी आव्हान म्हणून हे काम करण्याचं ठरवलं होतं. मला माझ्या देशासाठी काही तरी योगदान द्यायचं होतं. माझ्या 10 सहकाऱ्यांच्या टीमने हे काम यशस्वी केलं.” विशेष म्हणजे प्रसूतीच्या 1 दिवस आधीच (18 मार्च) त्यांनी या कोरोना किटचं काम पूर्ण करून त्याच्या मान्यतेसाठी ते राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी) पाठवलं. राष्ट्रीय विषाणू संस्थेने देखील ही किट 100 टक्के निकष पूर्ण करत असल्याचं सांगत त्याला मान्यता दिली, असं मिनल भोसले म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या