CoronaVirus News: ऑक्सिमीटरमार्फत कोरोनाच्या प्रसाराची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:54 IST2020-10-09T01:47:55+5:302020-10-09T06:54:24+5:30
पी दक्षिण विभागातील प्रकार; ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

CoronaVirus News: ऑक्सिमीटरमार्फत कोरोनाच्या प्रसाराची भीती
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी स्वयंसेविका करत आहेत. मात्र त्यांच्याकडून निष्काळजीपणे वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिमीटरमुळे कोरोनाच्या ‘होम डिलिव्हरी’ची धास्ती लोकांना वाटत असून विशेषत: हाय रिस्कमध्ये मोडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
गोरेगावच्या पी दक्षिण विभागात मोडणाºया चिंचोली बंदर परिसरात बुधवारी स्वयंसेवकांनी काही इमारतीमध्ये जाऊन रहिवाशांची तपासणी केली. मात्र तपासणी करताना एका कुटुंबाच्या हातातून काढलेला ऑक्सिमीटर दुसऱ्या कुटुंबाच्या बोटाला लावून तपासणी सुरू होती. या ऑक्सिमीटरला सॅनिटाईझ न करता या स्वयंसेविका थेट सरसकट सगळ्यांच्या बोटाला लावत तपासणी करत होत्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच त्यानंतर हात धुण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला गेल्याचेही समजते. याच परिसरात असलेल्या एका इमारतीच्या टॉप फ्लोअरवर दोन कुटुंबे कोरोनाबाधित आढळले असल्याने त्यांचे शेजारी घराबाहेर पडण्याचीही हिंमत करत नाहीत. मात्र याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी ऑक्सिमीटर निष्काळजीपणे हाताळले गेले, जिथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे, जे गेले सहा महिने घराबाहेरही पडलेले नाहीत. त्यामुळे अशा निष्काळजीमुळे कोरोनाची होम डिलिव्हरी होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता ऑक्सिमीटर सॅनिटायझेशन करण्याचा प्रयत्न पूर्वी फसून ते बिघडले होते. त्यामुळे ऑक्सिमीटर सॅनिटाईझ न करता नागरिकांना हात धुण्याचा सल्ला दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र स्वयंसेवकांकडून मात्र निष्काळजी होत असल्याचे या सगळ्यावरून उघड होत असून पालिकेने यात लक्ष घालण्याची विनंती केली जात आहे.
स्वयंसेविकांना देऊ सूचना
‘नागरिकांचे हात सॅनिटाईझ करून नंतरच ऑक्सिमीटरमार्फत त्यांची तपासणी करण्याच्या सूचना आम्ही आमच्या स्वयंसेविकांना देऊ, तसेच प्रत्येकाला सॅनिटायझरची बॉटल आम्ही पुरविली आहे.
- नितीश ठाकूर, आरोग्य अधिकारी, पी दक्षिण विभाग