Join us

coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना पैसे देऊन दिले खोटे डेथ सर्टिफिकेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 23:11 IST

एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याचे समोर येत असतानाच आता एका खासगी रुग्णालयाने पैसे घेऊन चुकीचे डेथ सर्टिफिकेट दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुंबई - देशभरात सर्वत्र होत असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावासोबतच आरोग्य क्षेत्रातील काही गैरव्यवहारदेखील समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याचे समोर येत असतानाच आता एका खासगी रुग्णालयाने पैसे घेऊन चुकीचे डेथ सर्टिफिकेट दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार मुबईतील पप्पू खान नामक व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयाने मृत रुग्णाच्या कुटुंबीयांकडून पैसे घेऊन संबंधित रुग्णाच्या मृत्यूचे कारण हृदयविकार दाखवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने या रुग्णालयाला नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे.  

धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या कुटुंबीयांनी स्वत:च पैसे देतानाचे स्टिंग ऑपरेशन केले होते. मात्र गवगवा झाल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीस कोरोना असल्याची माहितीच नसल्याचे सांगितले. या रुग्णाचा रिपोर्ट आपल्याकडे आलाच नसल्याचे मृताच्या भावाने सांगितले. आपल्या भावाला डबल निमोनिया आणि हार्टचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच आम्ही आयसीयूसाठी पैसे दिले होते, असा दावा मृताच्या भावाने केला.  

दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांना खरा रिपोर्ट आमच्यापासून लपवला. आजाराची लक्षणे पाहून आम्ही डेथ सर्टिफिकेट बनवून दिले, असा दावा रुग्णालयाने केला आहे. सर्व बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित मृत रुग्णाचे कुटुंबीय घर सोडून दुसरीकडे निघून गेले. मात्र महानगरपालिकेने त्यांना शोधून क्वारेंटाइन केले आहे. तसेच रुग्णालयाकडूनही स्पष्टीकरण मागणवण्यात आले आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई