Join us  

Coronavirus : 'सॅनिटायझरच्या फंद्यात पडू नका, मास्क वापरण्याची गरज नाही... फक्त हे करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 4:08 PM

मास्क वापरण्याची नितांत गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनापासूनच्या बचावासाठी मास्क वापरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही माझ्याकडे कधीच मास्क बघितला नाही. कारण, त्याची गरजच नाही.

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर कोरोनाच्या संशयित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, अनेक अफवा आणि गैरसमज पसरत आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त आणि सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच, घाबरून न जाता काही टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला. हात वारंवार स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचं असल्याचं मुंढेंनी सांगितलंय.

प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर या कोरोनाला दूर ठेवणे शक्य आहे. हा साथीचा आजार आहे. हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहेत. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही. हात स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक सॅनिटायझर विकत घेण्यावर भर देत आहेत. कारण त्यामुळे हात स्वच्छ ठेवले जातात. परंतु, केवळ साबणाने हात स्वच्छ आणि योग्य प्रकारे धुतले तर कोरोनापासून दूर राहता येते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे विनाकारण महागडे सॅनिटायझर घेण्याची गरज नाही. हात स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कारण कोरोनाबाधितद्वारे कोरोना विषाणू कुठेही लागू शकतो. आपण हात कुठेही ठेवतो आणि हाताला तो विषाणू लागून आपल्याला त्याची बाधा होऊ शकते. म्हणून हातांची योग्य स्वच्छता करावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर तुकाराम मुंढे यांनीही मोलाचे मार्गदर्शन जनतेला केले आहे. 

मास्क वापरण्याची नितांत गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनापासूनच्या बचावासाठी मास्क वापरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही माझ्याकडे कधीच मास्क बघितला नाही. कारण, त्याची गरजच नाही. याउलट मास्क वापरल्यानंतर तुम्ही हात-खाली-वर करता. त्यातूनच तुमच्या हाताचा स्पर्श झाल्याने संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते, असे तुकाराम मुंढेंनी म्हटले. तसेच, रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि स्टाफलाच फक्त मास्कची गरज आहे, इतरांना मास्कची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच सॅनिटायझरच्याही फंद्यात न पडण्याचे आवाहन मुंढेंनी केले आहे. डेटॉल वापरा किंवा साधारण साबण वापरा, त्यानं वारंवार हात स्वच्छ धुवा. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णापासून ३ फूट अंतरावर लांब थांबणे गरजेचे आहे. कारण, रुग्णाने शिंक मारली किंवा खोकला, तरी तो विषाणू ३ फूट अंतरापर्यंत येऊ शकत नाही, असेही मुंढेंनी सांगितले.

टॅग्स :तुकाराम मुंढेकोरोना वायरस बातम्यानागपूर