Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : गरजूंचे प्राण वाचवा, रक्तदान करा, कोरोनाला घाबरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 07:23 IST

राज्यात एप्रिल व मे महिन्यांत शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे नियमित रक्तदाते कमी होतात साहजिकच रक्तसाठ्याचा तुटवडा भासतो.

मुंबई : राज्यात एप्रिल व मे महिन्यांत शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे नियमित रक्तदाते कमी होतात साहजिकच रक्तसाठ्याचा तुटवडा भासतो. त्यामुळे या रक्त तुटवड्यावर उपाय म्हणून ‘कोरोनाला घाबरू नका, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा,’ असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.राज्य सरकार जनसामान्यांमध्ये याबाबत जागृती करून या आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जनतेला गरज नसेल त्या वेळेस गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मोठ्या प्रमाणात मेळावे, कार्यक्रम घेऊ नयेत अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यात दर दिवशी साधारणपणे ४५०० ते पाच हजार रुग्णांना गंभीर आजाराच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व बॅलेसिमिया, हिमोफिलिया या रक्ताच्या आजारग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते. ही बाब विचारात घेता रक्तदात्यांची कोरोना विषाणू बाबतीतची लक्षणे व प्रवासाचा पूर्व इतिहास तपासून व सुरक्षा, स्वच्छतेचे पालन करून तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सूचना जारी केलेल्या आहेत. रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.रक्तपेढ्यांची माहिती संकेतस्थळावरसर्व सामाजिक, धार्मिक संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत व गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त हेतूने सहकार्य करावे. इच्छुक रक्तदाते त्यांच्या नजीकच्या पेढीत जाऊनदेखील रक्तदान करू शकतात. नजीकच्या रक्तपेढ्यांविषयी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई