Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कुणी जबाबदारी घेतं का?; केईएमचे कर्मचारी मानसिक तणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:50 IST

रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जीव टांगणीला

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे केईएम रुग्णालय हे प्रमुख रुग्णालयांपैकी आहे. या रुग्णालयताही कोरोना कक्ष आहे. या रुग्णालयात जवळपास ७०० नर्सिंग स्टाफ काम करतो आहे, शिवाय य़ाखेरीज अन्य वैद्यकीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कामगारही अत्यावश्यक सेवेत काम करतात. मात्र रुग्णालय प्रशासनाकडे सुरक्षेविषयी वारंवार मागणी करुनही त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे हे सर्व कर्मचारी शारिरीक व मानसिक तणावात असल्याची कैफियत केईएममधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

केईएममधील वरिष्ठ वैद्यकीय कर्मचाऱ्याने सांगितले, सद्य स्थितीत शहर उपनगरातील स्थिती अधिक गंभीर होतेय, या जीवघेण्या परिस्थितीचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणेही दिसून येत नाही. त्यामुळे या संसर्गाचा संक्रमण नक्की कुठून होतेय याचीही कल्पना नाहीय, अशा स्थितीत आम्ही तीन पाळ्यांत रुग्णालयात काम करतोय. आम्हाला कुठलेच सुरक्षा कवच नाहीय, याविषयी रुग्णालय प्रशासन दाद देत नाही. तर अन्य एका महिला कर्मचारीने सांगितले,  या स्थितीमुळे शारिरीक थकवा आहेच, पण आता मानसिक ताण वाढतोय. हा ताण अधिक जीवघेणा आहे, शिवाय यात भर म्हणजे आम्ही सर्व रुग्णालयात काम करुन घरी जातो. त्यामुळे आम्ही कोरोना विषाणूचे सायंलट कॅरिअर ठरलो तर घरच्यांचा जीव धोक्यात घालण्याची शक्यता नाकारता येत नाही, मग याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे. कोरोनाशी लढणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी इतकी टोकाची मानसिक हतबलता सहन करणे या स्थितीत धोक्याचे आहे, हे प्रशासनाने गंभीरपणे घेतले पाहिजे

काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन सांगितले होते त्यावेळेसही चांगली सेवा उपलब्ध नव्हती. सध्या कोरोनामुळे कौटुंबिक व कामाप्रती कर्तव्य बजावताना ताण दिवसागणिक वाढतोय हे रुग्णालय प्रशासनास निर्दशनास येत नाही. यात महिला सहकाऱ्यांची अधिक घुसमट होतेय, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पीपीई किट्स नको, पण किमान एन 95 मास्क पुरवावेत जेणेकरुन या संसर्गाचा धोका नियंत्रित ठेवता येईल अशी केईएमच्या वैद्यकीय व अन्य कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

सोशल डिन्स्टन्सिंग कुठेय, वैद्यकी कर्मचारी हतबल

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी बेस्ट बसची सेवा देण्यात येत आहे. मात्र यात रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी अधिक बस सोडल्या पाहिजेत. जेणेकरुन दूरवरच्या प्रवासात सोशल डिन्स्टन्सिंग पाळण्यात येईल. सध्या एका सीटवर दोन जण बसत असल्याने संसर्ग संक्रमणाचा धोका संभावतो, ही बाबही विचारात घेतली पाहिजे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकेईएम रुग्णालयडॉक्टर