Join us

CoronaVirus: कोरोना रुग्णासाठी कुणी रेमडेसिविर देता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:55 IST

खूप शोधूनही बाजारात इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते आणायचे कुठून, असा प्रश्न नातेवाइकांना पडला आहे.

संदीप शिंदे मुंबई : गंभीर कोरोना रुग्णांवर रेमडेसिविर या अँटी व्हायरल इंजेक्शनची मात्रा प्रभावी ठरत असल्याने त्याच्या भारतातील उत्पादनास दोन दिवसांपूर्वी मंजुरी देण्यात आली. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासूनच विविध रुग्णालयांतील अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी डॉक्टरांकडून चिठ्ठी लिहून दिली जात आहे. खूप शोधूनही बाजारात इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते आणायचे कुठून, असा प्रश्न नातेवाइकांना पडला आहे.भारतीय ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाने (डीसीजीआय) काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांसाठी आपत्कालीन परिस्थितीत या औषधाचा वापर करण्याची परवानगी दिली होती. महाराष्ट्र सरकारलाही १० हजार इंजेक्शन उपलब्ध झाली. मात्र, त्याचा वापर प्रामुख्याने सरकारी रुग्णालयांमध्ये होत आहे. प्रत्येक अत्यवस्थ रुग्णाला पाच दिवसांत सहा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागतो. त्यामुळे सरकारकडील साठा मर्यादित रुग्णांसाठीच उपयुक्त ठरतोय. हे इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याने अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टर त्याच्या वापरासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना चिठ्ठी लिहून इंजेक्शन आणण्यास सांगितले जात आहे. मात्र, कोणत्याही औषध विक्रेत्याकडे ते उपलब्ध नाही. त्यामुळे ते मिळविण्याचा धडपडीत नातेवाइकांची दमछाक होत आहे.सरकारी कोट्यात उपलब्ध असलेली इंजेक्शन मिळविण्यासाठी ड्रग कंट्रोलर आॅफ इंडिया यांच्या नावाने एक विनंती पत्र, रुग्णाचे आधार कार्ड, रुग्णालयाच्या सही-शिक्क्याचे पत्र आणि कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट ई मेल करावा लागतो. त्यानंतर दोन दिवसांत इंजेक्शन उपलब्ध होईल, असे सांगितले जाते.मात्र, या प्रक्रियेबाबतची माहिती बहुतांश खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांकडेही नाही. अनेक रुग्णांचे नातेवाईक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत.मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत असल्याने प्रत्येकाला हे इंजेक्शन मिळेलच याची शाश्वती अद्यापही कुणालाच देता येत नाही. त्यामुळे तुरळक रुग्ण वगळता इंजेक्शन मिळविणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.>इंजेक्शनचा काळाबाजाररुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर या इंजेक्शनच्या शोधासाठी विविध औषध विक्रेत्यांना फोन करीत आहेत. त्यापैकी काही जणांकडून या इंजेक्शनची किंमत ८ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत सांगितली जाते. परंतु, त्या इंजेक्शनचा दर्जा आणि विक्रेत्यांबाबत विश्वासार्हता नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक त्या वाटेला जाताना दिसत नाहीत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस