Join us

coronavirus : आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पितळात करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 15:44 IST

आर्थिक चणचणीमुळे बंद पडलेले सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करून ते त्वरित चालू करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

-  मनोहर कुंभेजकरमुंबई - सध्या कोरोना साथीच्या सतत संसर्ग पसरणाऱ्या परिस्थितीमुळे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पश्चिम उपनगरात देखिल कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे.त्यामुळे या रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा व अन्य रुग्णालयात जाणे लांब पडत आहे.त्यामुळे १२ फेब्रुवारी २०१८ साली आर्थिक चणचणीमुळे बंद पडलेले सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करून ते त्वरित चालू करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

१९६० च्या दशकातील अभिनेत्री आशा पारेख यांच्या मातोश्री सुधा या सांताक्रूझ-खार परिसरात समाजसेविका म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांच्या आईच्या  प्रेरणेने त्यांनी १९६० साली सांताक्रूझ परिसरात त्यांनी सदर हॉस्पिटल सुरू केले होते.आणि त्यांच्या नावाने पश्चिम उपनगरात हे हॉस्पिटल लोकप्रिय झाले होते.

११० खाटांचे सदर हॉस्पिटल हे सांताक्रूझ पश्चिम येथील मोक्याच्या ठिकाणी असून पश्चिम उपनरातील कोरोना रुग्णांवर येथे उपचार होऊ शकतील.त्यामुळे सदर हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पिटलमध्ये करून ते लवकर सुरू करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती वांद्रे प.विधानसभेचे उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी लोकमतला सांगितले.

पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता उपचारासाठी आगाऊ पर्यायी व्यवस्था करावी.तसेच अत्यावश्यक उपचारासाठी आशा पारेख हॉस्पिटल हे पश्चिम उपनगरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपयोगी ठरू शकेल.त्यामुळे आशा पारेख हॉस्पिटल हे सुसज्य करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लवकर सुरू करावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना जानावळे यांनी शेवटी केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई