CoronaVirus dahi handi celebrated by doing blood donation in many areas of mumbai | CoronaVirus News: गोविंदांचा आरोग्यकाला!; लढा कोरोनाविरोधातला

CoronaVirus News: गोविंदांचा आरोग्यकाला!; लढा कोरोनाविरोधातला

मुंबई : मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने नाक्यानाक्यांवर लावलेल्या हंड्या, त्या फोडण्यासाठी गोविंदांची सुरू असलेली लगबग आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमलेली गर्दी कुठेच पाहायला मिळाली नाही. उलट कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध गोविंदा पथकांनी अनेक ठिकाणी आरोग्य, रक्तदान शिबिरांचे आयोजन करून दहीहंडीमागील मूळ उद्देश असलेल्या एकजुटीची, सामाजिक बांधिलकीची ताकद जगाला दाखवून दिल्याचे चित्र होते.

अनेक गोविंदा पथकांनी आरोग्य, रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. काही मंडळांनी परिसरात मास्क, सॅनिटायजर, साबण वितरित करीत मुंबईकरांना आरोग्याची काळजी घेत कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले. मंगळवारी रात्रीपासून मुंबईत श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव सुरू झाला होता. मुंबईतील बहुतांश मंदिरे बंद असली तरी इमारती, कॉलनी, चाळीतील मुंबईकरांनी, गोविंदा पथकांनी एकत्र येत जागेवाल्याला नारळ वाहून त्याची पूजा केली. कोरोनाला हरविण्यासाठी आम्ही या वर्षी दहीहंडी साजरी करणार नाही, असे म्हणत आरोग्यासाठी प्रार्थना केली. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतल्या गोविंदा पथकांसह पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील सर्व गोविंदा पथकांनी हा कित्ता गिरवला. सर्वच पथकांनी दहीहंडी साजरा न करता आरोग्य उत्सव साजरा करण्यावर भर दिल्याचे चित्र होते.

‘कोरोनाचे संकट दूर कर रे देवा महाराजा...’
संपूर्ण जगावर, देशावर आणि मुंबईवर जे काही कोरोनाचे संकट आले आहे देवा महाराज; ते लवकरात लवकर दूर कर रे देवा महाराजा. तुझ्या पोराबाळांना सुखी ठेव. त्यांच्यावर लक्ष ठेव. त्यांच्या आरोग्याची काळजी घे आणि साऱ्या जगाला या कोरोनाच्या महामारीतून लवकरात लवकर बरे कर रे महाराजा, असे काहीसे गाºहाणे जागेवाल्याला घालत मुंबईकर गोविंदानी यंदा दहीहंडी साजरी न करता आरोग्याचा दहीकाला साजरा केला.

असा साजरा झाला उत्सव
लोअर परळ येथील चाळीलगत अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या मंडळांनी बाळगोपाळांच्या आग्रहात्सव छोटी हंडी उभारत आरोग्य उत्सव साजरा करण्यावर भर दिला.
दरवर्षी गोविंदा पथकांमुळे गजबजलेल्या लालबाग, परळ, प्रभादेवी येथे यंदा शुकशुकाट पाहायला मिळाला.
घाटकोपर येथे नियमांचे पालन करून कोरोनारूपी हंडीचे आयोजन करण्यात आले होते.
दादरमधील आयडीयल येथील हंडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. मात्र यंदा येथेही सामसूम होते.
चिंचपोकळीसह करी रोडसारख्या मराठमोळ्या परिसरातील गोविंदा पथकांनी आरोग्य विषयक साहित्याचे वितरण करून उत्सव साजरा केला.
कुर्ला, घाटकोपर, सांताक्रुझ, विलेपार्ले येथील बहुतांश मंडळांनी जागेवाल्याला नारळ देत आरोग्य उत्सव साजरा करण्यावर भर दिला.
लालबाग मार्केट गोविंदा पथकाने परिसरात सॅनिटाइज करीत स्वच्छताविषयक संदेश दिला.
मध्य मुंबईतील गोविंदा पथकांनी आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचा संकल्प केला.
सांताक्रुझमधील तरुण गोविंदा पथकांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
वेसावे कोळीवाड्यात सामाजिक अंतर पाळत भाल्याने हंडी फोडण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus dahi handi celebrated by doing blood donation in many areas of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.