Join us

CoronaVirus : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत ३० नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 22:24 IST

CoronaVirus : देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

मुंबई - मुंबईतील अन्य विभागांमध्ये रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत असले तरी धारावीमध्ये दररोज सरासरी २० ते ३० रुग्ण सापडत आहेत. कल्याण वाडी या परिसरातून आतापर्यंत ३० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी या परिसरातील एका दोन वर्षाच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावी विभाग अति धोकदायक ठरला आहे. 

देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. येथील ३४ हून अधिक बाधित क्षेत्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या परिसरातील संशयित रुग्णांना वेळीच ओळखून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक येथील अति संवेदनशील विभागांमध्ये तपासणी करीत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा ५० हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातूनच नवीन रुग्ण सापडत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.

सोमवारी धारावी येथील शास्त्री नागर, पी एम जी पी कॉलनी, माटुंगा लेबर कॅम्प, कल्याण वाडी, नाईक नगर, मुकुंद नगर आदी परिसरातून तब्बल ३० रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर मिशन धारावीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आणि फिवर कॅम्प आयोजित केले जात आहेत. जेणेकरून, तात्काळ रुग्णांना ओळखून कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होईल, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

दादरमध्ये रुग्ण संख्या २५ वर...दादर पश्चिम येथे सोमवारी तीन नवीन रुग्ण सापडले आहेत. रानडे रोड, केळकर रोड आणि गोखले रोड या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या परिसरात निर्जंतुकीकरण करून कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस