Join us

CoronaVirus : राज्य पोलीस दलातील कोरोनाचा तिसरा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 05:46 IST

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे गेलेला राज्य पोलीस दलातील हा तिसरा बळी आहे.

मुंबई : कोरोनाबाधित पोलीस बाबाला उपचार मिळावेत म्हणून मुलाने राजावाडी ते कस्तुरबा, कस्तुरबा ते नायर अशी पायपीट केली. मात्र सर्वच रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे गेलेला राज्य पोलीस दलातील हा तिसरा बळी आहे.कुर्ला वाहतूक विभागात संबंधित ५६ वर्षीय पोलीस हवालदार कार्यरत होते. २० तारखेला ताप वाढल्याने  त्यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र ताप कमी न झाल्याने २१ तारखेला दुपारी मुलाने त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना नायर रुग्णालयाचा मार्ग दाखवला. मुुलाने विनंती करूनही दाखल करून घेतले नाही. त्यानंतर नायर रुग्णालयानेही तेच कारण देत केईएमध्ये जाण्यास सांगितले. रात्री ९ च्या सुमारास ते केईएममध्ये गेले. मात्र तेथील डॉक्टरांनी कस्तुरबात जाण्यास सांगितले. अखेर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना केईएममध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटद्वारे दिली. खबरदारीचा उपाय म्हणून या पोलिसाच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस