Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना निर्बंधमुक्तीची मुंबईत सावध सुरुवात; लोकल प्रवास सुरू; हॉटेल, रेस्टाॅरंटही रात्री दहापर्यंत खुली; माॅललाही परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:37 IST

CoronaVirus: हॉटेल, रेस्टाॅरंट आणि लोकल प्रवासाबाबतही काहीसे असे चित्र पाहायला मिळाले. अटीशर्थींसह देण्यात आलेल्या निर्बंधमुक्तीची मुंबईत सावध सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई : राज्यभरात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी रविवारी मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व मॉल सुरू झाले. मात्र ग्राहकांचे प्रमाण तुलनेने कमी होते. कारण मॉलमधील प्रवेशासाठी लसीच्या दोन मात्रा बंधनकारक असून, तेवढ्या वेगाने लसीकरण झालेले नाही. हॉटेल, रेस्टाॅरंट आणि लोकल प्रवासाबाबतही काहीसे असे चित्र पाहायला मिळाले. अटीशर्थींसह देण्यात आलेल्या निर्बंधमुक्तीची मुंबईत सावध सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.मॉलमधील देखभाल दुरुस्ती असो, कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस असो, सामाजिक अंतर असो; असे प्रत्येक नियम पाळण्यावर मॉलचा भर आहे. विशेषत: सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम, अटींच्या अधीन राहून मॉलमधील कामकाज केले जात आहे. अजून अपेक्षित ग्राहक नसले तरी काही दिवसांत इथली उलाढाल पूर्वपदावर येईल अशी आशा माॅलशी संबंधित लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

रेस्टोरंटला ५०; तर हॉटेलला ४० टक्के प्रतिसादराज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के ग्राहक क्षमतेने खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत रेस्टॉरंटला ५०, तर हॉटेलला ४० टक्के प्रतिसाद मिळाला, अशी माहिती हॉटेल संघटनांनी दिली.

दोन डोस घेतलेल्यांचा लोकल प्रवास सुरूदोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने रविवार, १५ ऑगस्टपासून दिली. मात्र, पहिल्याच दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने प्रतिसादाचा अंदाज मिळू शकलेला नाही. सोमवारही सुट्टी आहे. त्यामुळे मंगळवारपासून खऱ्या अर्थाने लोकलला किती गर्दी होते, याचे चित्र स्पष्ट होईल.महापालिकांनी कोरोना लसीकरणाची पडताळणी केल्यानंतर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बरवरील १ लाख २८ हजार लसीकरण पूर्ण झालेल्यांनी मासिक पास घेतला आहे. गुरुवारी मध्य व हार्बर मार्गावर २२,६८९, पश्चिम मार्गावर ११,६६४ जणांनी पास घेतला होता, तर रविवारी दुपारपर्यंत मध्य आणि हार्बर मार्गावर ८,८७८ तर पश्चिम मार्गावर ३,९२० जणांनी पास घेतला आहे.भावेश पटेल हे प्रवाशी म्हणाले की, इतक्या कालावधीनंतर लोकलमधून प्रवास करत आहे, याचा आनंद आहे. हमाल अतुल गुणवले म्हणाले की, लोकल प्रवासाच्या परवानगीमुळे आता हळूहळू आम्हालाही काम मिळेल.

लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढप्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य व पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सध्या ९० टक्के फेऱ्या चालविण्यात येत होत्या, आता ९५ टक्के फेऱ्या चालवल्या जातील.रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंग हे सर्व मुद्दे लक्षात घेत फेऱ्यांमध्ये वाढ केली.सध्या, मध्य रेल्वे मुंबई विभागाकडून १६१२ फेऱ्या चालवण्यात येत आहेत. ७४ सेवांच्या वाढीसह मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरी विभागांतील १६८६ फेऱ्या या एकूण सेवांच्या ९५ टक्के होतील. पश्चिम रेल्वे मुंबई विभागाकडून १२०१ फेऱ्या चालवत आहे. ९९ फेऱ्यांच्या वाढीसह पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरी विभागांतील १३०० उपनगरीय सेवा या एकूण सेवांच्या ९५ टक्के होतील.

वेळेत वाढ करावीरेस्टोरंट आणि बारसाठी रात्रीची जेवणाची वेळ १० पर्यंत ठेवण्यात आली आहे. मुंबईत साधारण कामावरून घरी जाण्यास रात्री ८ वाजतात. जेवणासाठी बाहेर जायचे असेल तर ९.३० होतात. रेस्टॉरंट आणि बारमध्ये जाऊन अर्ध्या तासात ऑर्डर देऊन जेवण करणे शक्य नाही. अनेक जण बाहेर जेवायला जाण्याचे टाळत आहेत. ५० टक्के क्षमतेचा नियम आम्ही पाळत आहोत, पण रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्याची वेळ १.३० पर्यंत करावी.- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष , आहार

हॉटेलमध्ये गर्दी टाळण्यासाठी बुकिंगसाठी स्लॉट तयार करण्यात आले आहेत. रविावारी सायंकाळपर्यंत ३५ ते ४० टक्के बुकिंग करण्यात आले आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रात्रीपर्यंत बुकिंगमध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे.- गुरबक्षसिंग कोहली, उपाध्यक्ष, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई लोकल