Coronavirus : तिसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनामुळे स्थिती बिघडू शकते, आरोग्यमंत्री टोप यांनी व्यक्त केली भीती
By अतुल कुलकर्णी | Updated: March 18, 2020 06:59 IST2020-03-18T06:59:25+5:302020-03-18T06:59:59+5:30
आपण सध्या दुस-या टप्प्यात आहोत. तिसरा टप्पा हा त्या पुढचा असून संपर्कातून संसर्गाची व्याप्ती वाढत जाते आणि अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणणे सहज शक्य नसते

Coronavirus : तिसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनामुळे स्थिती बिघडू शकते, आरोग्यमंत्री टोप यांनी व्यक्त केली भीती
- अतुल कुलकर्णी
मुंबई : आपण कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दुस-या टप्प्यात आहोत. वेळीच उपाय न केल्यास तिस-या टप्प्यात परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे येणारे १० ते १२ दिवस महत्त्वाचे आहेत. लोकांनी स्वत:हून गर्दीपासून दूर ठेवले पाहिजे. अन्यथा राज्य सरकारला नाईलाजाने जीवनावश्यक गोष्टी वगळता सगळ्यांवर बंदी आणावी लागेल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
परदेशातून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची बाधा होणे, हा पहिला टप्पा, तर अशा रुग्णांमुळे इतरांना बाधा होणे हा दुसरा टप्पा होय. आपण सध्या अशाच दुस-या टप्प्यात आहोत. तिसरा टप्पा हा त्या पुढचा असून संपर्कातून संसर्गाची व्याप्ती वाढत जाते आणि अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणणे सहज शक्य नसते, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी राज्यातल्या महत्त्वाच्या फार्मा कंपन्या, व विविध बँकांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. त्यास रिलायन्स, सिप्ला, आयसीआयसीआय, लुपिन, जीव्हीके, सीटी बँक अशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या सगळ्यांनी आप्तकालिन सेवा वगळता महाराष्टÑ बंद ठेवण्याची विनंती आरोग्यमंत्र्यांना केली. मुंबईतील लोकल रेल्वेसेवाही बंद करावी अशी शिफारसही या प्रतिनिधींनी केली.
खासगी रुग्णालयांना उपचारास परवानगी
कोरोनावर उपचार करण्याची परवानगी आता खासगी हॉस्पिटलना देण्यात आल्याची माहिती मंत्री टोपे यांनी दिली. त्यासाठी या आजारावर उपचार करण्यासाठी जे ‘प्रोटोकॉल’ पाळावे लागतात ते पाळणे त्यांना बंधनकारक असेल. मुंबईसह राज्यातील सर्व मोठ्या खासगी हॉस्पिटलना ही परवानगी देण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करण्याबाबत केंद्राकडून परवानगी घेण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.
लॅब टेस्टिंग सुविधा वाढणार
आज राज्यात तीन ठिकाणी लॅब आहेत व त्यात कोरोनाची तपासणी केली जात आहे. एका लॅबमध्ये २४ तासांत २५० टेस्ट करता येतात. येत्या २ ते ३ दिवसात आणखी तीन लॅब सुरु होणार आहेत. पुढील पंधरा दिवसाच्या आत आणखी पाच लॅब सुरु होतील.