Join us  

Coronavirus: धारावीमध्ये कोरोनाचा शिरकाव, झोपडपट्टीत निर्जंतुकीकरण; शेकडो नागरिक क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 1:58 AM

होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांवर पालिकेचे पथक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे.

मुंबई : सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी परिसरात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे अडीच हजार लोकवस्ती असलेल्या डॉ. बलिगानगरमध्ये तत्काळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.

तसेच खबरदारी म्हणून अग्निशमन दलामार्फत संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तर होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांवर पालिकेचे पथक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संशयित व्यक्तीला होम क्वारंटाइन करण्यात येते. मात्र झोपडपट्टी, चाळींमध्ये जागा छोटी आणि माणसे अधिक असल्यामुळे बाधित लोकांची संख्या वाढण्याचा धोका अधिक आहे.

यामुळे महापालिकेकडून झोपडपट्टी भागात निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, बुधवारी डॉ. बलिगानगर येथे राहणाºया ५६ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परदेश प्रवास अथवा संपर्काचा त्याचा कोणताच इतिहास नसताना या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली कुठून? याचा शोध महापालिका घेत आहे.

दरम्यान, पालिका प्रशासनाने बुधवारी तत्काळ या परिसराचे निर्जंतुकीकरण सुरू केले. मात्र गुरुवारी सकाळी पालिकेच्या ५२ वर्षीय कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. वरळी येथे राहणाºया या कामगाराची नियुक्ती सफाईच्या कामासाठी धारावीमध्ये करण्यात आली होती. अडीच हजार लोकवस्ती असलेला हा परिसर पालिकेने सध्या सील केला आहे. तसेच नागरिकांना घरातच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजीव गांधी क्रीडा संकुलात तीनशे खाटांची व्यवस्था करून कोरोनाची लागण होण्याचा धोका असलेल्या संशयितांना ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये घबराट...

डॉ. बलिगानगर परिसरात आठ इमारती, ३०८ फ्लॅट असून, ९१ दुकाने आहेत. हा परिसर सील करून येथील अडीच हजार लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्णाचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार, श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. अशा हाय रिस्क लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा स्टॅम्प मारण्यात आला आहे. दैनंदिन गरजांची काळजी पालिका घेत असल्याचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

घाबरू नका - वर्षा गायकवाडा

कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर मी धारावीची पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेतला आहे. संबंधित यंत्रणांशी चर्चाही केली आहे. धारावीत कोरोना रूग्ण आढळल्याने लागलीच घबराटीची स्थिती निर्माण करण्याची आवश्यकता नाही. पोलिस आणि पालिका प्रशासनासोबतही बैठक घेतली आहे़ लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस